breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात आतापर्यंत २७०० पोलिसांना कोरोनाची लागण, पोलीस आयुक्तांची माहिती

पुणे | प्रतिनिधी 
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असताना सर्व आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन कसोशीने आपलं कर्तव्य बजावत आहेत. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने बूस्टर डोसची घोषणा केली आहे. पुण्यात कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत २७०० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्याच्या घडीला शहरात २६४ पोलीस कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाली आहे.

खुद्द पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ताही या काळात स्वतःची विशेष काळजी घेत आहेत. आपल्या कार्यालयातही गर्दीत काम करण्याचं टाळून अमिताभ गुप्ता यांनी जिम, योग, सायकलिंग वर भर दिला आहे. आपल्यासाठी ही दुहेरी जबाबदारी असल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. स्वतःच्या परिवाराची काळजी घेण्यासोबतच मला माझ्या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेणं गरजेचं असल्याचं गुप्ता यांनी सांगितलं.

पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे कोरोनाचे सर्व नियम पाळून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत काम सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आयुक्तालयातर्फे प्रत्येक कर्मचाऱ्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे जरुरी औषधोपचार देण्यात आले आहेत. याचसोबत प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःच्या फिटनेसची काळजी घेण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.

आतापर्यंत पुण्यात २० पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांना होणाऱ्या कोरोनामुळे अनेक महत्वाच्या गुन्ह्यांमधला (पेपर लिक प्रकरण) तपास थंडावल्याचंही गुप्ता यांनी मान्य केलं. पुणे सायबर पोलिसांत कार्यरत असलेल्या ९५ कर्मचाऱ्यांपैकी २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी अनेकांना कोविडची लागण झाली असल्यामुळे बरेच वरिष्ठ पोलीस अधिकारी कोविडग्रस्त झाल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button