breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“…तर लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का?”; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

पुणे |

करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार आज संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल, असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यांनी आज पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शनही घेतलं. मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन आता भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे.

पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावेळी बोलताना ते म्हणाले, मंदिरं पूर्णपणे बंद ठेवणं चुकीचं आहे. नियम करुन द्या. एकावेळी दहाच जण आत जातील, ते बाहेर आल्याशिवाय पुढचे दहा आत जाणार नाहीत, मास्क, सॅनिटायझर असे नियम करा. पण मंदिरं आता बंद ठेवू नका. मंदिरं फक्त श्रद्धेचा प्रश्न नव्हे तर रोजगाराचा स्रोतही आहेत. मंदिराबाहेरच्या दुकानावर अनेक संसार चालतात. त्यांचं काय?

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका करण्याची संधीही सोडली नाही. यावेळी त्यांनी दोन वर्षे वारी बंद असल्याबद्दलही भावना व्यक्त केली आहे. चारचाकी गाडीतून थेट मंदिरात जाऊन पूजा करणाऱ्यांना वारकऱ्यांच्या भावना काय कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर लोक फार काळ आपल्या भावना दाबून ठेवू शकणार नाहीत. आणखी काही काळानंतर लोक कुलुपं तोडून मंदिरात घुसतील असंही ते म्हणाले. आता लवकरच जैनांचं पर्युषण पर्व सुरु होईल, मुस्लिमांना नमाज पढायला मस्जिदीत जायचं असतं, ख्रिश्चनांना चर्चमध्ये जायचं असतं, शीखांना प्रार्थनेसाठी गुरुद्वारेत जायचं असतं. या सर्वांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. धार्मिक स्थळं बंद असतील तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचं का?, असंंही ते यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष मतांसाठी देव,धर्म मानत नाहीत त्यांना खूष करण्यासाठी उद्धव ठाकरे मंदिरे खुली करायला तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button