ताज्या घडामोडीपुणे

छोटेसे गाव झाले बहुभाषिकांचे;उपनगरांमध्ये औंध अग्रस्थानी

पुणे | प्रतिनिधी 


काही वर्षांपूर्वीपर्यंत शहराच्या गावकुसाबाहेरचा परिसर म्हणून ओळखला जाणारा औंधचा भाग आता मुंबईहून येताना शहराचे प्रवेशद्वार झाला आहे. कोथरूडनंतर शहरात वेगाने वाढलेल्या उपनगरांमध्ये औंध अग्रस्थानी आहे. त्याशिवाय हिंजवडीसारखी आयटी हब आणि मुंबई महामार्गाच्या निकटच्या परिसरात औंध येत असल्याने एकेकाळचे वाड्या-वस्त्यांमध्ये सामावलेले हे गाव आता मोठमोठ्या इमारती, काचेच्या तावदानातील शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि

मुळा नदीकाठचे औंध हिरव्यागार शेतांनी बहरलेले आणि बैठ्या घरांचे गाव होते, अशी आठवण परिसरातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० पर्यंत औंधमध्ये ग्रामपंचायत होती. त्यानंतर पुणे महापालिकेत त्याचा समावेश झाला. विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत औंध फारसे विस्तारले नव्हते. हिंजवडी येथे बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये उभी राहू लागली. देशातील विविध राज्यांमधून तरुण संगणक अभियंत्यांची पावले पुण्याकडे वळू लागली. या तरुणांनी हिंजवडीपासून जवळ आणि मुंबई-पुणे महामार्गालगत शहराच्या हद्दीवरील शांत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंधमध्ये राहण्यास पसंती दिली अन् पाहता पाहता औंध वेगाने विस्तारले.

सिंध सोसायटी या परिसरातील पहिली उच्चभ्रू नागरिकांची सोसायटी. त्यानंतर नॅशनल सोसायटी, गुडविल या सोसायट्यांमध्ये पुण्यातील नामांकित उद्योगपती आणि व्यावसायिकांनी घरे बांधली. परिहार चौक, ब्रेमेन चौक, सानेवाडी, आनंदनगर, गायकवाडनगर परिसरात मोठे मॉल्स आणि हॉटेल उभारण्यात आली.

औंधच्या सीमेवरील खडकी येथे मराठा साम्राज्याची शेवटची लढाई झाली. पूर्वीच्या काळी औंध येथे लष्करी तळ होते. औंध गावठाणात ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे. त्याच्याजवळच पंचवेताळाचेही स्थान आहे. ही मंदिरे आजही येथील ग्रामस्थांच्या जीवनातील महत्त्वाचे भाग आहेत. ‘औंधमधील नीलकंठेश्वर मंदिरात एक मध्ययुगीन स्मारक शिळा आहे. तेथील नदीघाटावर एक समाधी आहे. त्यावर वाघाचे शिल्प आहे. ही समाधी कोणाची आहे, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. या नदीघाटाला वाघाचा घाट म्हणून ओळखले जाते,’ अशी माहिती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंडॉलॉजी विभागाच्या डॉ. मंजिरी भालेराव यांनी दिली. ‘नदीकाठी असणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिंदे राजघराण्याकडे होते. कालांतराने हे मंदिर आणि राहता वाडा शिंदे यांच्या वंशजांनी रयत शिक्षण संस्थेला दिला,’ अशी माहिती विठ्ठल मंदिराची देखभाल करणारे अण्णा खताळ यांनी दिली.

ब्रेमेन चौक ते आनंदऋषीजी चौकदरम्यान असणारी बॉडी गेट पोलिस चौकीचा वाहतुकीला अडथळा होत होता. ही वास्तू पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित होती. परिणामी ही वास्तू हटविणे शक्य होत नव्हते. अखेर पुरातत्त्व खात्याने पोलिस चौकीच्या इमारतीचे स्थलांतर करण्याचे निश्चित केले. त्यासाठी इमारतीच्या प्रत्येक दगडावर क्रमांक घालून शास्त्रीय पद्धतीने काटेकोर काळजी घेऊन इमारतीचे स्थलांतर करण्यात आले, अशी माहिती माजी आमदार विजय काळे यांनी दिली. या परिसरात ब्रिटिशांच्या काळात या ठिकाणी गव्हर्नरचे बॉडीगार्ड राहत असल्याची नोंद आहे. ‘बॉडी गेट पोलिस चौकीसहची आणखी एक वास्तू स्थलांतरित करण्यासाठी पुरातत्त्व खात्याने तयारी केली आहे. मात्र, प्रशासन आणि पोलिस खाते यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे स्थलांतर रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील कोंडी सुटत नाही,’ असेही त्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button