धुळे |
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करणारे आंदोलक शुक्रवारी अचानक आक्रमक झाले. आक्रमक आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी दगड आणि चपला फेकत भ्याड हल्ला केला. याप्रकरणी आता संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटत आहेत. त्यातच आता धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करत हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणी करत जोरदार आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले यांनी बोलताना सांगितलं की, आज पर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासात अशी घटना घडली नव्हती. मात्र, काल मुंबई येथील माननीय शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचारी यांनी केलेल्या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतो. तसेच या घटनेच्या पाठीमागील खरा मास्टरमाईंड कोण आहे, आणि हे कट कारस्थान कोणी रचलं आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा. तसेच या एसटी कर्मचारी आंदोलनाला मुठ-माती देणाऱ्यांच्या विरोधात देखील कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली.