breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना…”, भाजपाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना खोचक टोला!

मुंबई |

गुरुवारी निकाल लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं जोरदार मुसंडी मारली असून पाचपैकी चार राज्यांमध्ये एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत सध्या भाजपा आहे. गोव्यामध्ये काही अपक्षांच्या मदतीने भाजपा सरकार स्थापन करणार आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीनं अंतर्गत कलहात अडकलेल्या काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेतली. त्यामुळे काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपाकडून काँग्रेसवर आणि पर्यायाने महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यात येत आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटच्या माध्यमातून काँग्रेस प्रदेधाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

  • पंजाबमध्ये काँग्रेसला अंतर्गत कलह भोवला?

पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय कलह दिसून आला. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंद सिद्धू. याची सुरुवात सिद्धू आणि तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वादाने झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षालाच रामराम ठोकला. त्यानंतर पुन्हा एकदा सिद्धू यांचं नवे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्याशी बिनसलं. हा देखील वाद विकोपाला जात असल्याचं दिसू लागताच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यात यशस्वी मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवून आणली. मात्र, एवढं करूनही पंजाबमध्ये काँग्रेसच्या पदरी घोर निराशाच आली.

  • “सिद्धू आणि नाना पटोलेंमध्ये साम्य”

याच मुद्द्याला धरून आता भाजपाकडून काँग्रेसला लक्ष्य केलं जात आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटच्या माध्यमातून यावरच टोला लगावला आहे. “पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि आपले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बरंच सामन्य आहे. दोघेही बाहेरून काँग्रेसमध्ये गेलेले. दोघेही राहुल गांधींचे खास. दोघांनाही नुसत्या गावगप्पा करायची सवय. आता सिद्धूने तर काम चोख केलं, आता नाना मागे राहून कसं चालेल?” असा खोचक सवाल या ट्वीटमध्ये विचारण्यात आला आहे.

  • फडणवीस आणि पाटलांची सूचक वक्तव्य…

महाराष्ट्रात सत्तापालटाविषयी भाजपाचे दोन प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चा सुरू झाली आहे. “आम्ही २०२४ च्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे. पण त्याआधी राज्यातलं सरकार पडलं, तर आम्ही सरकार स्थापन करू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर, “शिवसेना ही काही आमची शत्रू नाही. काँग्रेससोबत सरकार करणं शक्यच नाही. शिवसेनेसोबत सरकार करणार का? या जरतरच्या गोष्टी आहेत. तोंड खूप पोळलं आहे, तर फुंकून प्यावं लागेल”, असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात नेमक्या काय घडामोडी घडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button