breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

धक्कादायक! स्पर्श हॉस्पिटल व्यवस्थापनाने पालिका पुन्हा बदनाम, रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात व स्पर्श हॉस्पिटलचा कर्मचारी अटक

पिंपरी चिंचवड |

पिंपरी चिंचवड शहरात स्पर्श हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यातील व्यवस्थापन व ठेकेदारी यावरून मागील ४ महिन्यापासून वाद चर्चेत आहेत. आयसीयू बेड उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचे प्रकरण गाजत असतानाच आता महापालिकेने मोफत उपलब्ध करून दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल 40 हजार रुपयांना काळ्या बाजारात विकताना ” स्पर्श’च्या कर्मचाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. बेडसाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता स्पर्श हॉस्पीटलच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे याला रेमडेसिवीर काळ्या बाजारात विकताना अटक केली आहे . या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची अब्रुची लक्तरे पुन्हा वेशीला टांगली आहेत. शिस्तप्रिय आयुक्त राजेश पाटील यांच्या डोळ्यासमोर असे प्रकार घडत आहेत.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने करोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय फेब्रुवारी २०२० महिन्यात उभारले. या रुग्णालयाला मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचा ठेका स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आला आहे. या हॉस्पीटलच्या दोन डॉक्टरांनी बेडसाठी पैसे घेतल्यामुळे अटक झालेल्या मुद्यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी दहा दिवसांत “ स्पर्श’वर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही कारवाई न करता या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम चालविले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , आरोपी नितीन हरीदास गुंड ( वय 23 , रा . काळेवाडी , सागर काकासाहेब वाघमारे ( वय 24 रा . काळेवाडी ) व अजय बाबाराज दराडे ( वय 19 रा . पिंपरी ) हे तिघे काळ्याबाजारात रेमडेसीवीर विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकामार्फत नितीन गुंड याच्याशी संपर्क साधून इंजेक्शनबाबत विचारणा केली. त्यावेळी दोन इंजेक्शन मिळतील असे सांगितले. तसेच प्रत्येकी 40 हजार प्रमाणे दोन इंजेक्शनसाठी 80 हजारांची मागणी केली. इंजेक्शन घेण्याची तयारी दाखविल्यानंतर आरोपींनी काळेवाडी येथील डेंटल प्लॅनेट हॉस्पीटलसमोर येण्यास सांगितले. यावेळी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करत वरील तीनही आरोपींना व त्यांच्याकडील रेमडेसिवीरची दोन इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली. यानंतर आरोपींकडे चौकशी केली असता ऑटो क्लस्टर येथे ब्रदर म्हणून काम करणाऱ्या अजय बाबाराज दराडे याच्याकडून इंजेक्शन घेतल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यानुसार तिघांना अटक करण्यात आली असून , त्यांच्याकडील 25 हजार रुपये किंमतीचे 3 मोबाईल , 4 हजार 389 रुपये किंमतीची दोन इंजेक्शन असा 30 हजार 389 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

30 एप्रिल रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका ऑटो क्लस्टर येथील रुग्णांसाठी मोफत स्वरुपात उपलब्ध करून देत असलेली रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकली जात असल्याचा आरोप केला होता. हा आरोप महापालिका आयुक्तांनी गांभिर्याने घेतला नसल्याचेच तसेच नगरसेवकांनी व्यक्त केलेली भिती या प्रकारानंतर खरी ठरल्याचेच स्पष्ट झाले आहे. यामुळे निद्रेत असलेले महापालिका आयुक्त आतातरी निर्णय घेतील का ? असा प्रश्न सामान्य पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना पडला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button