breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! ३८ कोटींच्या विमा रकमेसाठी अन्य व्यक्तीचा खून करत मृत्यूचा बनाव

  • राजूरमध्ये पाच जणांना अटक

नगर |

अमेरिकेतील विमा कंपनीमार्फत उतरवलेला, तब्बल ३८ कोटी रुपयांचा (पाच मिलियन अमेरिकन डॉलर) आयुर्विमा हडप करण्याचा प्रयत्न राजूर (ता. अकोले) पोलिसांनी उधळला. विमा रक्कम मिळवण्यासाठी कट रचून एका मनोरुग्णाचा सर्पदंशाने खून करण्यात आला. या वेळी संबंधित व्यक्ती सर्पदंशाने मृत्युमुखी पडली, असा बनाव करण्यात आला होता. यासंदर्भात ‘मृत’ भासवलेल्या व्यक्तीसह पाच जणांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. यामध्ये मुख्य आरोपी प्रभाकर भिकाजी वाघचौरे (५४, रा. राजुर, अकोले) याच्यासह सर्पमित्र हर्षद रघुनाथ लहामगे (राजुर), प्रभाकरचे दोन सहकारी प्रशांत रामहरी चौधरी (धामणगाव पाट) व संदीप तळेकर (पैठण, अकोले) व हरीश रामनाथ कुलाळ (कोंदणी, अकोले) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. प्रमुख आरोपी प्रभाकर वाघचौरे याला बडोदा गुजरात येथे अटक करण्यात आली. राजूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नरेंद्र साबळे, उपनिरीक्षक किरण साळुंके, श्रीरामपूरचा सायबर सेल, अकोले पोलीस यांनी संयुक्तपणे ही कामगिरी केली.

या गुन्ह्याची पाश्र्वभूमी अशी, वाघचौरे सन १९९४ मध्ये अमेरिकेला गेला. वॉशिंग्टन डीसी येथे तो स्वयंपाकी म्हणून काम करत होता. नंतर त्याने कुटुंबाला तिकडेच नेले. त्याची मुले सध्या नोकरी करतात. सन २०१३ मध्ये त्याने पत्नीची १ मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे ७.५ कोटी रुपये) व स्वत:ची ५ मिलियन अमेरिकन डॉलरची (सुमारे ३८ कोटी रुपये) असा एकूण १५ लाख अमेरिकन डॉलरचा आयुर्विमा काढला होता. जानेवारी २०२१ मध्ये प्रभाकर वाकचौरे एकटाच राजूरला परतला.

सुमारे सहा महिन्यापूर्वी २२ एप्रिल २०१९ रोजी राजूर पोलीस ठाण्यामध्ये प्रभाकर भिमाजी वाघचौरे याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमेरिकेतील विमा कंपनीच्या संशयातून राजूर पोलिसांनी अधिक तपास केला. त्यात या टोळीने नवनाथ यशवंत अनप (५०) या मनोरुग्णाची देखभाल करण्याचा बनाव करत त्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. हा मनोरुग्ण जवळच्याच गावातील आहे. प्रभाकरने सर्पमित्राकडून कोब्रा जातीचा नाग आणून आठ दिवस बरणीत ठेवला. नंतर एका रात्री मनोरुग्णाला माळरानावर नेऊन त्याच्या पायाला सर्पदंश घडवला. आपण त्याची देखभाल करतो, एकमेव वारसदार असल्याची खोटी कागदपत्रेही प्रभाकरने तयार करुन त्याचा अंत्यविधीही केला होता.

  • पत्नीच्या अपघाती निधनाचाही बनाव

प्रभाकर वाघचौरे याने अमेरिकेतील ‘ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनी’मार्फत विमा उतरवला होता. प्रभाकरने यापूर्वी पत्नीचा अपघाती मृत्यू झाला असाही बनाव केला होता व तिच्या विमा रकमेची मागणी कंपनीकडे केली होती. या कंपनीसाठी भारतात ‘डीलिजन्स इंटरनॅशनल‘ ही कंपनी काम पाहते. या कंपनीसाठी काम करणारे शोधक प्रतिनिधी पंकज गुप्ता यांच्या चौकशीत पत्नीचा मृत्यू झाला नसतानाही विमा रकमेची मागणी केल्याचे आढळले. त्यामुळे प्रभाकरचा दावा कंपनीने फेटाळला होता. प्रभाकरची पत्नी अमेरिकेत जिवंत आहे.

  • अशी फिरली तपासाची चक्रे

पत्नीच्या मृत्यूचा बनाव करून विमा रक्कम हडपण्याचा प्रयत्न फसल्याने प्रभाकरने स्वत:च्याच मृत्यूचा बनाव केला. मात्र त्यासाठी एका मनोरुग्णाचा खून केला. हा मनोरुग्ण म्हणजेच प्रभाकर असल्याचे भासवले गेले. या कटात त्याने इतर चौघांना सहभागी करून घेतले. आपली ७० लाखांची पॉलिसी आहे, त्यातील ३५ लाख रुपये देण्याचे आमिष त्याने इतर चौघांना दाखवले. स्वत:चा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची कागदपत्रे कंपनीकडे पाठवून त्याने विमा रकमेची मागणी केली. त्याच्या मागील अनुभवावरून ही चौकशीही पंकज गुप्ता यांनी केली. गुप्ता यांनी पत्नीच्या मृत्यूचा बनाव राजूर पोलिसांच्या निदर्शनास आणला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली. पंकज गुप्ता यांनी अशा प्रकारची चार प्रकरणे यापूर्वी उघडकीला आणली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button