breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

दसऱ्याला शिवाजी पार्क सुनेसुने राहणार ? शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाहीच…

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून जोरदार मोर्चेबंधणी सुरू असून शिवसेना – शिंदे गटातील तणावाचे वातावरण, प्रभादेवीमध्ये उभय गटांमध्ये झालेला वाद या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी नेमकी कोणाला परवानगी द्यायची असा पेच मुंबई महानगरपालिकेसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाने याबाबत विधी खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. मात्र एकूण परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता यंदा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी कोणालाच परवानगी मिळणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, यंदा दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क मैदान सुनेसुने राहण्याची चिन्हे आहेत.

गेली अनेक वर्षे शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पूर्वी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पश्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी ठिकठिकाणांहून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर येत होते. काही महिन्यांपूर्वी शिवसनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर सातत्याने शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटाकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला आहे. मात्र शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनीही याच कारणासाठी अर्ज करून शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. यावरून उभयतांमध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन जी-उत्तर विभाग कार्यालयाने या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या विधी खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. अद्याप विधी खात्याने आपला अभिप्राय कळवलेला नाही.

जागतिक अभियंता दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांसाठी रवींद्र नाट्य मंदिरमध्ये गुरुवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. शिंदे, शेवाळे आणि चहल यांच्या भेटीनंतर शिवाजी पार्कच्या आरक्षणाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान कोणाला द्यायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यातच प्रभादेवी परिसरात बंडखोर आमदार सदा सरवणकर आणि शिवसेनेचे महेश सावंत यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकूण परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, शिवसेना अथवा बंडखोर आमदारांना शिवाजी पार्क मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यास मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी नाकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बंडखोर आमदारांच्या गटाने वांद्रे-कुर्ला संकुलातील मोठे मैदान दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केले आहे. तसेच वांद्रे-कुर्ला संकुलातील अन्य मैदान आरक्षित करण्यासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. मात्र एमएमआरडीएने परवानगी नाकारली आहे, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत दसरा मेळाव्याचे शिवाजी पार्क मैदानातच आयोजन करायचेल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. उभयतांमधील वाद विकोपाला जाऊ लागल्याने यंदा शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यास कोणालाच परवानगी मिळण्याची शक्यता नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेचा निर्णय विधी खात्याच्या अभिप्रायावर अवलंबून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button