breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होणार

मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोना संकटामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी सभागृहात पार पडणार आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न होईल, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना दिली. या मेळाव्याला सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती असेल.

‘कोरोनाचे संकट जरा ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचे नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे’, असे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार आज ते पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘शिवसेनेचा दसरा मेळावा १०० टक्के होणार आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये त्याच जोरात हा मेळावा होईल. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करतील आणि देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न करतील.’

ठाकरे कुटुंबाचा शिवाजी पार्कशी फार जवळचा संबंध आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला मेळावा २७ नोव्हेंबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे घेतला होता, तेव्हापासून आजतागायत याच मैदानावर सेनेचा दसरा मेळावा होत आला आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा मागील वर्षी पार पडला होता. मात्र या मेळाव्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे शिवतीर्थावरील भव्य सभा टाळून शिवसेनेचे मोजके नेते आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला होता. शिवसैनिकांसाठी हा मेळावा ऑनलाईनदेखील दाखविण्यात आला होता. याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी काही वेळ आपले मुख्यमंत्रीपद बाजूला ठेवून केवळ शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण करताना भाजपावर आसूड ओढले होते. त्यानंतर आता राज्यात कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने शिवाजी पार्कऐवजी शिवसेनेने यंदाही दसरा मेळावा सभागृहात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button