breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शिवसेनेच्या आमदाराला अंडरवर्ल्डमधून धमकीचा फोन; तक्रार दाखल

नाशिक |

महाराष्ट्रातील एका शिवसेनेच्या आमदाराने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार सुहास कांदे यांना सोमवारी संध्याकाळी धमकीचा फोन आला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे तक्रार केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल आला आणि फोन करणाऱ्याने स्वत: ची ओळख अक्षय निकाळजे, छोटा राजनचा पुतण्या म्हणून सांगितली. निकाळजे याने कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात डीपीडीसीच्या निधी वाटपासंदर्भात दाखल केलेली रिट याचिका मागे घेण्यासाठी धमकावलं. याचिका मागे न घेणं तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी चांगलं नसेल, असं म्हटल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे. आमदार सुहास कांदे यांना धमकी आल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहे. आमदाराला धमकी येणं ही बाब गंभीर आहे.

मंत्रीमंडळाची बैठक सुरू असताना याबाबत कळल्यानंतर आपण यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात पूरग्रस्तांना निधी वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला नांदगाव शहर आणि परिसरास मुसळधार पावसाचा फटका बसला. पुरामुळे शेतीसह शहरातील निवासी वस्ती, बाजारपेठेचे नुकसान झाले. यासंदर्भात आढावा बैठकीत नांदगावातील पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कांदे यांनी केली. परंतु, भुजबळ यांनी कांदे यांना शांत राहण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याविषयी निर्णय घेण्यात येईल, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोघांच्याही समर्थकांनी घोषणाबाजी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button