breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शिवसेना जिल्हाप्रमुख चिंचवडे गद्दारी करून भाजपमध्ये चाकरी करायला गेले : खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी । प्रतिनिधी

भाजपवासी (BJP) झालेले शिवसेनेचे (Shivsena) पुणे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे हे आपल्या खूप जवळचे होते, अशी कबुली शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी रविवारी (ता.२६ सप्टेंबर) जाहीरपणे दिली. एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांना मी  शिवसेनेत आणले. चांगल्या कार्यकर्त्याला पक्षात आणणे ही चूक असेल, तर ती मी केली आहे, असे त्यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर पिंपरी-चिंचवडमध्ये सांगितले. दरम्यान, चिंचवडे हे पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चाहूल लागली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.

चिंचवडे पक्ष सोडणार आहे, अशी चाहूल लागताच त्यांना काढून टाका, अशी मागणी मी वरिष्ठांकडे (पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर) केली होती. मात्र, ही कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी पक्ष सोडला, असा गौप्यस्फोट बारणे यांनी केला. त्यांना नेता म्हणून संधी दिली. तरीही ते पक्ष सोडून भाजपची चाकरी करायला गेले, हे दुर्दैव आहे. ही गद्दारी आहे. म्हणून मी त्यांचा निषेध करतो, असे ते म्हणाले. चिंचवडेंनी पक्ष सोडल्यानंतर त्यांनी दिलेली ही पहिलीच प्रतिक्रिया होती. ती देताना त्यांनी चिंचवडेंचा खरपूस समाचार घेतला.

बारणे म्हणाले आशा पद्धतीने पक्षात उपभोग घेऊन कोणी जात असेल, तर त्याला त्याची जागा निवडणुकीतून दाखवून दिली पाहिजे. ते उभे राहणाऱ्या वॉर्डात शिवसेनेचा नगरसेवक होईल, यासाठी ताकदीने उतरायचे आहे. अशांना पाडण्याचे काम आपल्याला सामूहिकपणे करायचे आहे. तरच अशी ही मंडळी जाग्यावर येतील, असे ते म्हणाले. आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. कारण उमेदवारी देताना चूक झाली, तर त्याचा परिणाम पक्षाला भोगावे लागतात. यापूर्वी हे झालंय, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते भोसरी येथे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते, खासदार संजय राऊत, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेनेची राज्यात सत्ता असली, तरी पुणे जिल्ह्यात आपण कुठे कमी पडतोय हा प्रश्न सतावत आहे. त्यासाठी पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व तरूणांसमोर घेऊन जाण्याची गरज अहिर यांनी प्रतिपादित केली. आगामी महापालिका निवडणूक दोन सदस्यीय पॅनेल पद्धतीने निवडणूक झाल्यास ती लढविणे सोपे जाणार असून त्याचा शिवसेनेला फायदा होईल, असे आढळराव म्हणाले. तीन सदस्यीयमध्ये इतर दोन उमेदवार निवडून आणणे अवघड होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button