breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात

नगर |

शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले. विविध समाजोपयोगी उपक्रमही या वेळी राबवण्यात आले. सकाळी जुन्या बस स्थानकाजवळील अश्वारूढ पुतळय़ास महापौर रोहिणी शेंडगे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिव पुतळय़ाची पूजाही करण्यात आली. दिवसभर याठिकाणी विविध नागरिकांकडून भेटी देऊन अभिवादन केले जात होते. शहरातील तरुण मंडळांनी चौक सुशोभित करून, मंडप कमानी उभारून, शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाची प्रतिष्ठापना केली. अवघे शहर भगवे झाले होते. विविध संस्था, शाळा, महाविद्यालयातून छत्रपतींच्या चरित्रावर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. ध्वनिवर्धकावर पोवाडे गायले जात होते. वाहनांवरही भगवे झेंडे लावून युवक उत्साहात फिरत होते.

  • १०१ फूट उंच शिवस्वराज्य ध्वज

केडगाव नगरात पुणे रस्त्यावर नागरिक व युवकांनी एकशे एक फूट उंच शिवस्वराज्य ध्वज उभारला. या वेळी मल्लखांबाची आकर्षक प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. पारंपरिक वाद्यांनी रंगत आणली. छत्रपतींच्या चरित्रावर व्याख्यानही झाले.

  • शिवजयंतीच्या मुहूर्तावर विवाह

शिवजयंतीचा मुहूर्त साधून राज्य सरकारच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या कुटुंबामध्ये हिवरेबाजार येथे विवाह समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी शिवाजी महाराजांचे विचार कृतीत आणण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button