ताज्या घडामोडीमुंबई

मनसुखच्या हत्येचा सूत्रधार शर्माच

 मुंबई | प्रतिनिधी

‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके असलेले वाहन उभे करून दहशत निर्माण करणे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करणे या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माचा सक्रिय सहभाग होता; तसेच मनसुख हत्याकांडाच्या कटाचा प्रदीप शर्मा हाच मुख्य सूत्रधार होता,’ असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला.

‘पूर्वी निलंबित असलेला पोलिस अधिकारी सचिन वाझे हा पुन्हा पोलिस सेवेत आला होता. त्यामुळे या संपूर्ण कटाच्या अनेक बैठका मुंबई पोलिस आयुक्तालय इमारतीच्या आवारात झाल्या आणि त्या बैठकांना शर्माही उपस्थित राहिला. मनसुखची हत्या करणाऱ्या गुंडांना पैसे देण्यासाठी वाझेने शर्माकडे ४५ लाख रुपये दिले,’ असा दावाही ‘एनआयए’ने केला आहे.

‘चमकम’फेम माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा हा या प्रकरणात १७ जून २०२१पासून अटकेत असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शर्माने त्याविरोधात उच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्याला तीव्र विरोध दर्शवणारे प्रतिज्ञापत्र ‘एनआयए’ने अॅड. संदेश पाटील यांच्यामार्फत न्या. ए. एस. चांदूरकर व न्या. गोविंदा सानप यांच्या खंडपीठासमोर दाखल केले.

‘तपासात जे पुरावे मिळाले त्याप्रमाणे कट रचणे, दहशतवादी कृत्य करणे, दहशतवादी टोळीचा भाग असणे, अपहरण व हत्या करणे आणि पुरावे नष्ट करणे या गुन्ह्यांमध्ये शर्माचा सक्रिय सहभाग होता, हे स्पष्ट होते. शर्मा व अन्य आरोपींनी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) अत्यंत गंभीर गुन्हे केले आहेत. मनसुख यांची हत्या म्हणजे मोठ्या कटाची परिणती आहे. वाझे व अन्य आरोपींनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी अँटिलियाजवळ विस्फोटके असलेली एसयूव्ही कार उभी केली आणि त्यात जैश-उल-हिंद या नावाच्या संघटनेचे धमकीचे पत्र ठेवले. या माध्यमातून त्यांनी अंबानी कुटुंबीयांसह लोकांमध्येही दहशत पसरवली. मनसुख यांची कार चोरीला गेल्याचे दाखवून त्या कारमध्ये विस्फोटके ठेवण्यात आली. त्यामुळे मनसुख यांना संपूर्ण कटाची माहिती होती. नंतर मनसुख यांना ती कार त्यांनीच उभी केल्याची जबाबदारी घेण्यास वाझेने त्यांना सांगितले. मात्र, मनसुख यांनी ती जबाबदारी घेण्यास नकार दिला. त्यामुळे मनसुख यांच्यामुळे आपला संपूर्ण कट उघड होऊन आपला हेतू साध्य होणार नाही, असा विचार करून मनसुख यांनाच संपवण्याचा कट वाझेने शर्मासोबत मिळून रचला,’ असे ‘एनआयए’ने नमूद केले आहे. ‘शर्माचा सहभाग हा पुराव्यांतून सुस्पष्ट दिसत आहे. तो एक प्रभावशाली पोलिस अधिकारी होता. जामीन दिल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करण्यासह साक्षीदारांवरही दबाव टाकू शकतो. त्यामुळे त्याचे अपिल फेटाळून लावावे,’ अशी विनंतीही ‘एनआयए’ने केली आहे. खंडपीठाने शर्माच्या अपीलावर आता १७ जुलैला सुनावणी ठेवली आहे.

‘एनआयए’चा आरोप

– कट रचणे, दहशतवादी कृत्य, दहशतवादी टोळीचा भाग असणे, अपहरण व हत्या, पुरावे नष्ट करणे या गुन्ह्यांत शर्माचा सक्रिय सहभाग.

– मनसुख यांनाच संपवण्याचा कट वाझेने शर्मासोबत मिळून रचला.

– पोलिस आयुक्तालय इमारतीच्या आवारात, तसेच वरळी सीफेस, मलबार हिल अशा ठिकाणी त्यांच्या बैठका झाल्या.

– मनसुख यांच्या हत्येसाठी वाझेने शर्माकडे ४५ लाख रुपये दिले.

– सुनील मानेने मनसुख यांना सोबत नेऊन मारेकऱ्यांच्या कारमध्ये बसवले.

– मनसुख यांची कारमध्येच हत्या करून त्यांचा मृतदेह ठाणे खाडीत टाकून दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button