breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

ज्ञानवापी वादावर शरद पवार यांचं रोखठोक मत, मोदी सरकारवर तुटून पडले

केरळ : गेल्या तीन आठवड्यांपासून देशभरात ज्ञानवापी मशीद-मंदिर वाद गाजत आहे. या प्रकरणाने पूर्ण देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. याच वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले सडेतोड मत मांडत मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही. पण काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे, असं भाजपचं धोरण आहे. महागाई, बरेजगारी यांवरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शरद पवारांनी मोदी सरकारवर आसूड ओढला.

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अयोध्या प्रकरण निकाली निघाल्यानंतर देशात शांतता नांदेल, असं आम्हाला वाटत होतं. पण भाजपचा विचार आणि विचारसरणी वेगळी आहे. अशा प्रकारच्या धार्मिक विषयांना हवा देऊन देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ज्ञानवापी प्रकरणावर शरद पवार म्हणाले, “वाराणसीत मंदिर आहे. मंदिराला कुणाचा विरोध नाही. पण मंदिराजवळ मशीदही आहे. आज मशिदीवरून नवा मुद्दा उपस्थित करून देशात जातीय वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. वाराणसीचे मंदिर जितके जुने आहे, तितकीच ज्ञानवापी मशीदही खूप जुनी आहे. गेल्या तीन-चारशे वर्षांत मशिदीचा विषय कोणीही काढला नाही”. “अयोध्या प्रकरण संपल्यानंतर वाराणसीचा मुद्दा ऐरणीवर आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सर्व संघटना या कामात सहभागी झाल्या आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. या देशात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यावर देशासोबतच जगभरातील लोकही अभिमान बाळगतात. ताजमहालसारखी वास्तुकला ही आपल्या देशाची ओळख आहे. आज राजस्थानचा कोणीतरी समोर येतो आणि म्हणतो की ताजमहाल आमचा आहे. आमच्या पूर्वजांनी ते बनवले”.

“दिल्लीचा कुतुबमिनार कोणी बांधला हे जगाला माहीत आहे. तेथील न्यायालय यासंदर्भात निर्देश देणार आहे. पण काही लोक कुतुबमिनार हिंदूंनी बांधल्याचा दावा करत आहेत. मी या सगळ्या गोष्टी यासाठी सांगतोय कारण आज देशाची खरी समस्या महागाई, बेरोजगारी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून जातीयवादी, सांप्रादायिक विचारांना चालना दिली जात आहे”, असं पवार म्हणाले. मोदी सरकार आणि भाजप आज देश चालवत आहे. एक मुद्दा संपला की नवा मुद्दा समोर आणायचा, असा त्यांचा अजेंडा आहे. काहीही करून देशात हिंदू-मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांमधील बंधुभाव कायमच संपला पाहिजे, असंच भाजपचं धोरण असल्याची टीका पवारांनी केली. आज देशातील महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे. महागाई वाढली आहे. मात्र महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार कोणतेही पाऊल उचलत नाहीत. बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यांना उत्तर देण्याचा एकच मार्ग आहे. जातीयवादी विचारांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना एकत्रितपणे पावले उचलावी लागतील, असं मतंही पवारांनी मांडलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button