breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

‘युपी झांकी है, अभी महाराष्ट्र बाकी है’ म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना शरद पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले “तो महाराष्ट्र…”

उत्तर प्रदेश |

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपा सत्तेत येणार असल्याचं चित्र स्पष्ट झाालं आहे. एग्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या यशानंतर राज्यातील भाजपा नेते आता महाराष्ट्राची वेळ असल्याचं म्हणत ठाकरे सरकारला आव्हान देत आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेत्यांकडून भाजपा नेत्यांनी ‘उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ अशा घोषणा दिल्या. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

  • “पंजाबमधील निकाल काँग्रेसला धक्का देणारा”

“पंजाबमध्ये हा जो बदल झाला आहे तो भाजपला अनुकूल नाहीच, मात्र हा बदल काँग्रेसला धक्का देणारा आहे,” असं स्पष्ट मत शरद पवार यांनी यावेळी मांडलं. “पंजाब असं एक राज्य होतं ज्याठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. तिथे आज अतिशय वेगळं चित्र बघायला मिळत आहे,” असेही शरद पवार म्हणाले.

  • “दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये ‘आप’ला झाला”

“आप हा अलीकडे तयार झालेला राजकीय पक्ष आहे. त्याने दिल्लीत गेल्या दोन निवडणूकांमध्ये ज्याप्रकारे यश संपादन केले. ज्या पद्धतीने प्रशासन दिले त्याने दिल्लीतील सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. पंजाब हे दिल्लीच्या दृष्टीने सीमेवरील राज्य आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम पंजाबमध्ये ‘आप’ला झाला असं दिसते,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

“त्यामुळे पंजाब सोडला तर बाकीच्या ठिकाणी लोकांनी जे सध्या आहेत त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली व भाजपाचं राज्य स्थापन झालं आहे,” असंही शरद पवार यांनी सांगितलं. लोकशाहीत लोकांनी कौल दिला त्याचा स्वीकार व सन्मान करायला हवा असंही ते म्हणाले.

  • “किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा”

“आज देशात प्रभावशाली पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चर्चा होऊ शकते. ही चर्चा लगेचच होईल असे नाही. आता संसदेचे अधिवेशन १४ मार्च पासून सुरू होत आहे. एक महिना सर्व सदस्य दिल्लीत असणार आहेत. पुढची नीती ठरवण्याची पावलं उचलून लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आणणे हे कर्तव्य आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं. भाजपाकडून आता ‘अभी महाराष्ट्र बाकी है’ असं बोललं जात असल्यासंबंधी विचारलं असता “ठीक आहे ‘अभी महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है’ असा स्पष्ट इशारा शरद पवारांनी दिला.

  • गिरीश महाजन काय म्हणाले ?

भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उत्तर प्रदेश झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सर्व एग्झिट पोल फेल ठरतील असंही म्हटलं. पाचही राज्यात काँग्रेसने एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, काँग्रेसला एकुण ३५ जागाही मिळत नाहीयेत असंही ते म्हणाले.

“देशाने मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. भाजपाचे विचार, कर्तृत्व, बोलणं यावर लोकांचा विश्वास आहे. पंजाब सोडलं तर इतर राज्यांमध्ये भाजपाने मुसंडी मारली असून बहुमताकडे जात आहेत. याउलट काँग्रेसने पाचही राज्यात एकुण ६९० च्या आसपास जागा लढवल्या, पण त्यांना एकूण ३५ जागाही मिळत नाहीयेत. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे,” अशी टीका त्यांनी केली. “शिवसेना पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आली आणि मुख्यमंत्री बसवला. नुसती तोंडाची बडबड करण्याशिवाय यांना काय जमतं. पुढच्या निवडणुकीत दोन खासदार आणि २० आमदार निवडून आणून दाखवा,” असं आव्हान गिरीश महाजन यांनी यावेळी दिलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button