breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

शेतकऱ्यांना जादा मिळू लागल्याचे सध्याच्या केंद्र सरकारला पाहवत नाही, शरद पवारांचा आरोप

अहमदनगर : ‘पूर्वी केंद्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारी मंडळी होती. आता तसे राहिले नाही. उलट शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले तर सध्याच्या केंद्र सरकारला पहावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे येऊ लागले की धोरणे बदलली जातात. सध्याही साखर आणि गव्हातून शेतकऱ्यांना बरे पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना या दोन्हींच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे,’ असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.

अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता. शेवगाव) येथे आयोजित एका कार्यक्रमात पवार बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी दूरस्थ पद्धतीने सहभागी झाले होते. शेवगाव तालुक्यातील बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रावर सोमवारी हा कार्यक्रम झाला. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे, बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, आमदार निलेश लंके, संग्राम जगताप, नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले यावेळी उपस्थित होते. सध्या निर्माण झालेल्या अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर मात्र पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. ऊसाला तोडणी न मिळाल्याने शेवगाव तालुक्यातील तसेच शेजारी बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पवार यांनी या विषयाला सोयीस्कर बगल दिल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

पवार यांनी साखर उद्योगाचा आढावा घेताना यासमोरील आव्हाने आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. पवार म्हणाले, ‘सहकारी तत्त्वावर देशातील पहिला साखर कारखाना धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहमदनगर जिल्ह्यात झाला. पूर्वी केंद्र सरकारला शेतकऱ्या विषयी जाण होती. आम्ही केंद्रात सत्तेवर असताना शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात होते. आता चुकीचे निर्णय घेतले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बदलत्या परिस्थिमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि कारखान्यांनी केवळ साखरेवर अवलंबून न राहता इथेनॉल, अल्कोहोल, वीज निर्मिती यांच्यावर भर देण्याची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांचाही फायदा होईल,’ असेही पवार म्हणाले.

यावेळी दूरस्थ पद्धतीने बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, बोधेगाव येथील कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आले नाहीत, मात्र त्यांनी ऑनलाईन संवाद साधला. गडकरी म्हणाले, ‘देशात साखरेची २६० लाख टन गरज असताना ३६० लाख टनापेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर व्यवसायाचे गणित बिघडले आहे. अलीकडे ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्यामुळे साखर निर्यातीत आपल्याला फायदा झाला असला तरी हे नेहमी शक्य नाही. त्यामुळे वेगळे उपाय शोधले पाहिजेत. भविष्यात सर्व वाहने इथेनॉल वर चालवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशात साडेचारशे कोटी लिटर इथेनॉल तयार होते. त्यातील वीस टक्के वापर जरी केला तरी मोठा फायदा होईल. त्यातून शेतकऱ्यांनाच चांगले पैसे मिळतील,’ असेही गडकरी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button