breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लाज आणली : मोफत उपचार असताना ‘आयसीयू’ बेड साठी १ लाख रुपयांची ‘खंडणी’

पिंपरी-चिंचवडमधील ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमधील घटना

राष्ट्रवादीसह भाजपाच्या ‘त्या’ नगरसेवकांचा ‘कॉम्प्रमाईझ’साठी प्रयत्न

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणारे ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये पंपरी-चिंचवडकरांना मोफत उपचार आहेत. मात्र, याठिकाणी एका रुग्णाला ‘ आयसीयू’ बेड उपलब्ध करुन देण्यासाठी तब्बल १ लाख रुपयांची मागणी केली. अगोदर मानसिक तणावात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची असाहयता लक्षात घेवून एकप्रकारे ‘खंडणी’ उकळण्याची घटना समोर आली आहे.
महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आयसीयूची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगत “एक लाख रुपये द्या आम्ही बेड मिळवून देतो”, असे सुचविले. एक लाख रुपये घेऊन त्यांना महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेतले.ही सुविधा मोफत असताना एक लाख रुपये घेतल्यामुळे हे कोविड सेंटरचे संचलन करणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलचे बिंग फुटले. स्पर्श हॉस्पिटलच्या सल्लागाराने ८० हजार रुपये तर खासगी हॉस्पिटलचालकाने २० हजार रुपये घेतल्याचा आरोप संबंधित नगरसेवकांनी केला आहे.
शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे बेड नसल्याचे सांगितले जाते. पण, महापालिका खर्च करत असलेल्या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून पैसे घेऊन बेड दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अत्यंत संकटकाळातही ठेकेदार माणुसकीला लाज येईल, अशी कृती करीत आहेत.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू आहे. स्पर्श ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार सुविधा असतानाही रुग्णांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या खासगी संस्थांवर आता महापालिका आयुक्त राजेश पाटील काय कारवाई करणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

भाजपाचा ‘स्मार्ट’ नगरसेवक, राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची ‘सेटलमेंट’
चिंचवड विधानसभेतील भाजपाचा ‘स्मार्ट’ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील नगरसेविका दोघांचा ‘स्पर्श’ संस्थेला सपोर्ट आहे. विशेष म्हणजे, या वादग्रस्त संस्थेत अप्रत्यक्षपणे संबंधितांची भागीदारी असल्याची चर्चा आहे. यापूर्वी तत्त्कालीन अतरिक्त आयुक्त अजित पवार यांना पदावरुन हटवण्यासाठी संबंधित नगरसेविकेने राजकीय ताकद वापरली होती. दरम्यान, स्पर्श संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये होणारी लूट लक्षात आल्यानंतर भाजपाच्या दोन नगरसेवकांनी रुग्णांच्या नातेवाईकांची बाजू घेतली. न्याय मागितला. प्रसंगी संबंधित डॉक्टरला फटकारले. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पुरावे सादर केले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

वादग्रस्त स्पर्श संस्थेकडे आहे काम…
सुमारे ५०० कोटी रुपयांची बोगस बीले सादर केल्याप्रकरणी चर्चेत आलेल्या स्पर्श या खासगी संस्थेकडे ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरचे काम आहे. या संदर्भात स्पर्श संस्थेच्या संचालक डॉ. अमोल होळकुंदे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत त्यांनी बोलणे टाळत महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हस जगताप यांच्याशी संपर्क करण्यास सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले, या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

मरणाच्या दारात असलेल्या रुग्णाची लुबाडणूक…
चिखली येथील महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. उपचार सुरू असताना हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रुग्ण मुख्याध्यापिकेची प्रकृती खालावल्याने त्यांना अति दक्षता विभागात अर्थात ‘आयसीयू’ मध्ये हलवावे लागेल, असे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. ‘आम्ही तुम्हाला आयसीयू बेड मिळवून देतो, हॉस्पिटलचे नाव सांगत नाहीत. फक्त एक लाख रुपये भरावे लागतील’ असे सांगितले. नातेवाईकांनी एक लाख रुपये दिले. एक लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांना महापालिकेच्या ऑटो क्लस्टरमधील मोफत उपचारांची सुविधा असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मुख्याध्यापिकेचे बुधवारी (दि.28) दुर्दैवाने निधन झाले.

भाजपा नगरसेवकांनी प्रकार उघडकीस आणला…
महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी मुख्याध्यापिकेच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेतल्याची माहिती चिखलीतील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी नगरसेवक विकास डोळस यांच्यासह गुरुवारी ऑटो क्लस्टर गाठले. गायकवाड आणि डोळस यांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याबद्दल जाब विचारला. संबंधित खासगी हॉस्पिटलने पैसे घेतले असतील असे सांगून कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श हॉस्पिटलने हात झटकले. मात्र, संबंधित रुग्णाच्या नातेवाईंकांनी नगरसेवकांना पुरावे दाखवले. त्यानंतर या नगरसेवकांनी त्यांचा मोर्चा संबंधित खासगी हॉस्पिटलकडे वळविला. तेथील डॉक्टरला जाब विचारला. डॉक्टर फैलावर घेतल्यावर या डॉक्टरने ‘स्पर्श’च्या सल्लागाराचे नाव घेतले. त्याने ८० हजार रुपये घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर हा सगळा गैरप्रकार उघडकीस आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button