Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

काँग्रेस नेत्यांना पाहून फडणवीस म्हणाले, आमची ३ मतं इकडे, सतेज पाटील म्हणाले, ‘तो मी नव्हेच!’

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत एका-एका मतासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्न करत असताना विधिमंडळात एक मजेदार प्रसंग घडला. अचनाकपणे समोर आलेल्या काँग्रेस नेत्यांना पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गुगली टाकली. ‘आम्हाला वाटलं आमची तीन मतं इकडं आहेत’, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांनी मारलेला षटकार पाहून मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, बंटी पाटील पोट धरुन हसले. तेवढ्यात सतेज (बंटी) पाटलांनीही फडणवीसांचा षटकार प्रेक्षकांमध्ये बसून कॅच केला. ‘तो मी नव्हेच’, असं सतेज पाटील म्हणताच फडणवीस, दरेकर खो खो हसले.

राज्यसभेच्या चुरशीच्या लढाईनंतर आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजप-महाविकास आघाडीत पुन्हा संघर्ष होतो आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान करण्यासाठी सर्वपक्षीय आमदार विधिमंडळात येत आहेत. आमदार ग्रुपने मतदानासाठी येत असल्याने संबंधित पक्षाचे नेते त्यांना आवश्यक सूचना करुन मतदानासाठी घेऊन जात आहेत.

फडणवीस-काँग्रेस नेते हास्य विनोदात रंगले

काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील विधिमंडळाच्या कॉरिडॉरमधून जात होते. तेवढ्यात समोरुन देवेंद्र फडणवीसही त्यांना दिसले. मतदानाच्या ऐन धामधुमीत तीन काँग्रेस नेत्यांना एकत्र पाहून पाहून फडणवीसांनी त्यांची फिरकी घेतली. ‘आम्हाला वाटलं आमची तीन मतं इकडं आहेत’, असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या विनोदावर सगळेच नेते खो खो हसले. पण शांत बसतील ते सतेज पाटील कसले… त्यांनीही ‘तो मी नव्हेच’ म्हणत फडणवीसांचं विनोदी आक्रमण परतावून लावलं.

मग एकमेकांच्या मतदानाविषयी फडणवीस थोरातांनी परस्परांना माहिती दिली. पहिल्या टप्प्यात आमच्या भरपूर आमदारांचं मतदान झालं, असं थोरातांनी फडणवीसांना सांगितलं. त्यावर बरं बरं झालं, आम्हीही तसंच केलंय, असं फडणवीसांनी म्हटलं. गेली १० दिवस एकमेकांना पराभूत करण्याचा चंग बांधलेले नेते आज मात्र सगळं काही विसरुन हास्यविनोदात रंगून गेले.

महाविकास आघाडीचं जोरदार प्लॅनिंग

आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीसांनी पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. शिवसेना सोडता सर्वच पक्षांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागत आहे.

मतदान सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी अनिल परब आणि अनिल देसाई यांच्याकडून सकाळच्या घडामोडींची माहिती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांना मार्गदर्शन केलं. मतदान करताना ५ आमदारांच्या गटाने मतदान करावं. मतदान करताना कुणीही गडबड करु नये. ज्या प्रमाणे मतदानाच्या सूचना दिल्यात, त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button