breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँगरूम सील

पिंपरी | मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे तसेच टपाली मतपेट्या आज बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून कडेकोट बंदोबस्त असणारी ही स्ट्राँगरूम आज सील करण्यात आली. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सीआरपीएफचे सुभेदार दुर्गेश कुमार मीना तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचे समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, टपाली मतदान कक्षाचे समन्वय अधिकारी अनिल दौंडे, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी, पोलीस उपआयुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त सतीश कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, मनुष्यबळ कक्षाचे समन्वय अधिकारी राजू ठाणगे, निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी प्रमोद ओंभासे, संपर्क अधिकारी सचिन चाटे, निवडणूक सहाय्यक अभिजीत जगताप, सचिन मस्के, मनिषा तेलभाते, माध्यम समन्वयक शिवप्रसाद बागडी, किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

हेही वाचा     –      ‘छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांना धडा शिकवू’; सतीश काळे 

मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी १३ मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून ४ जून २०२४ रोजी बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील वेटलिफ्टिंग हॉलच्या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करण्यात आला असून त्यामध्ये ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या कक्षाला केंद्रीय सुरक्षा दलासह महाराष्ट्र पोलिस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही यंत्रणेसह आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

१३ मे रोजी मावळ लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर या अंतर्गत येणाऱ्या पनवेल, मावळ, उरण, कर्जत, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ निहाय निश्चित केलेल्या ठिकाणी मतदान साहित्य जमा करण्यात आले. त्या ठिकाणाहून कंटेनरमध्ये मतदानासाठी वापरलेले ईव्हीएम यंत्रे आणि मतमोजणीसाठी आवश्यक इतर मतदान साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत बालेवाडी येथे आणण्यात आले. त्यानंतर मतदान यंत्रांसह सर्व साहित्य स्ट्राँग रूममध्ये ठेऊन ही रूम सील करण्यात आली.

मतदान प्रक्रियेसाठी मावळ लोकसभे अंतर्गत असलेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघाकरीता १६३२ बॅलेट युनिट, ५४४ कंट्रोल युनिट आणि ५४८ व्हीव्हीपॅट यंत्रे, कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी १०१७ बॅलेट युनिट, ३३९ कंट्रोल युनिट आणि ३४५ व्हीव्हीपॅट यंत्रे, उरण विधानसभा मतदारसंघासाठी १०३२ बॅलेट युनिट, ३४४ कंट्रोल युनिट आणि ३४६ व्हीव्हीपॅट यंत्रे, मावळ विधानसभा मतदारसंघासाठी ११७० बॅलेट युनिट, ३९० कंट्रोल युनिट आणि ३९६ व्हीव्हीपॅट यंत्रे, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी १६४७ बॅलेट युनिट, ५४९ कंट्रोल युनिट आणि ५५६ व्हीव्हीपॅट यंत्रे, पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १२०० बॅलेट युनिट, ४०० कंट्रोल युनिट आणि ४०२ व्हीव्हीपॅट यंत्रे असे एकूण ७६९८ बॅलेट युनिट, २५६६ कंट्रोल युनिट आणि २५९३ व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात आली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button