breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शाळा बंद, मात्र ‘वॉटर फिल्टर’ खरेदीच्या हालचाली जोमात !

  • भाजप नगरसेविकेचा खरेदीसाठी अतिरिक्त आयुक्तांवर दबाव
  • टक्केवारीसाठी विषय मंजुरीपासून ते ठेकेदार आणण्यापर्यंत मजल

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळा बंद असताना महिला व बाल कल्याण समितीने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ‘वॉटर फिल्टर’ खरेदीचा विषय प्रशासनाच्या समोर आणला आहे. महिला व बालकल्याण समितीची विषयाला मंजुरी घेऊन ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी एका भाजप नगरसेविकेचा कमालीचा आटापिटा सुरू आहे. कोविड काळाचे भान विसरलेल्या या नगरसेविकेने या विषयासाठी चक्क अतिरिक्त आयुक्तांवर (1) दबाव आणला आहे. कोरोनामुळे दिवसाला शेकडो रुग्णांचा मृत्यू होत असताना या नगरसेविकेला या अवास्तव खरेदीच्या कामात एवढा ‘इंटरेस्ट’ का निर्माण झाला आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना विषाणुच्या दुस-या लाटेने हाहाकार माजवला आहे. मृत्युने अक्षरषः तांडव घातला आहे. परिस्थितीचे भान विसरून भाजपचे काही नगरसेवक आर्थिक हितापोटी भलत्याच विषयांच्या मागे हात धुवून लागले आहेत. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने शाळा बंद करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गेल्या एक वर्षापासून शहरातील सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थी खरी राहून ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. अशातच महिला व बालकल्याण समितीची सदस्य असलेल्या भाजप नगरसेविकेने विद्यार्थ्यांना शुध्द पाणी पिण्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून प्रत्येक शाळेत वॉटर फिल्टर बसविण्याचा विषय समोर आणला. त्याला समितीची मान्यता घेण्यात आली. एवढेच नाही तर या दस्तुरखुद्द नगरसेविकेने या कामासाठी ठेकेदार सुध्दा आपलाच आणला. त्याला काम मिळवून देण्यासाठी नगरसेविकेचा आटापिटा सुरू आहे. या कामांची फाईल चाळण्यासाठी नगरसेविकेच्या पतीची देखील लुडबूड सुरू असते, ही बाब देखील समोर आली आहे.

‘वॉटर फिल्टर’ खरेदीच्या विषयाची फाईल अतिरिक्त आयुक्त (1) विकास ढाकणे यांच्या टेबलावर आहे. पडताळणी केल्यानंतरच सध्याच्या परिस्थितीत आवश्यकतेचा विचार करून फाईलवर स्वक्षरी होणार आहे. कोविड काळात अवास्तव विषय म्हणून प्रशासनाकडून हा विषय रद्द केला जाईल, या भितीपोटी नगरसेविकेने चक्क अतिरिक्त आयुक्तांवर दबाव आणला आहे. तब्बल अडीच कोटी रुपयांच्या खरेदीचा हा विषय मर्जीतील ठेकेदाराला मिळवून देण्यासाठी नगरसेविकेने अतिरिक्त आयुक्तांच्या केबिनमध्ये जाऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापोटी ठेकेदाराकडून संबंधित नगरसेविकेला टक्केवारीने पैसे मिळणार असल्यामुळेच या विषयांमध्ये नगरसेविका आणि तिच्या पतीचा ‘इंटरेस्ट’ वाढत चालला आहे.

सध्या कोरोनाने पिंपरी-चिंचवडमध्ये अक्षरषः थैमान घातले आहे. मृत्युचे तांडव डोळ्याने पाहवत नाही. ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. लसीकरण यंत्रणेची ऐशी की तैशी सुरू आहे. याचे नियोजन करण्यात पालिका प्रशासन पदोपदी अपयशी ठरत चालले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायचे सोडून भाजपची ही नगरसेविका अवास्तव विषयात टक्केवारी लाटण्यासाठी धडपडत आहे. भाजपाच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ मानल्या जाणा-या नेत्यांना हे संपूर्ण प्रकरण माहीत असून सुध्दा का एवढी शांतता बाळगली जात आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button