breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्यमेव जयते : ‘स्पर्श’ संस्थेवर गुन्हा दाखल करुन कामही काढणार: आयुक्त राजेश पाटील

पिंपरी । प्रतिनिधी
ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये सुरू असलेले वादग्रस्त ‘स्पर्श’ संस्थेचे काम आगामी १० दिवसांत काढून घेण्यात येईल. तसेच, रुग्णांच्या नातेवाईकांकडून आयुसीयू बेडसाठी १ लाख रुपयांची मागणी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष सभा शुक्रवारी आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टरमध्ये चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेडसाठी एका रुग्णाच्या नातेवाईकांकडून स्पर्श संस्थेने तब्बल एक लाख रुपये घेतले. मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. ”एक लाख रुपये द्या आणि ऑटो क्लस्टरमध्ये बेड मिळवा” अशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित स्पर्श व्यवस्थापनाचे काम काढून घ्यावे आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिले होते.
**
नाहीतर आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार…
महापालिका पैसे देत असतानाही ‘स्पर्श’ संस्थेचे व्यवस्थापन दादागिरी करते. खासगी हॉस्पिटलशी सेटिंग करून बेडसाठी रुग्णांकडून लाख -लाख रुपये घेते. हे प्रकरण मिटविण्यासाठी 15 ते 20 लाख देण्याची तयारी दर्शविली होती. सत्तारूढ पक्षनेते मध्यस्थी करत होते. त्यामुळे ‘स्पर्श’ संस्था आणि वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा’ हॉस्पिटलवर खंडणी, दरोड्याचा, चोरीचा, सदोष मनुष्यवधाचा आजच्या आज गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी महासभेत केली. ‘स्पर्श’ वर गुन्हा दाखल केला नाही तर आयुक्तांवरच गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला. संबंधित ठिकाणचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज बाहेर काढा. हे प्रकार कोणते नगरसेवक चालवत आहे, धंदा करत आहे हे कळेल, असेही नगरसेवक म्हणाले.
***
रेकॉर्डींग सभागृहात ऐकवले…
चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू असून स्पर्श ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. या प्रकरणाचा भांडाफोड करणारे भाजपचे कुंदन गायकवाड यांनी ऑटो क्लस्टरमध्ये बेडसाठी एक लाख रुपये घेतल्याची ‘रेकॉर्डिंग’ सभागृहात ऐकविले. महापालिका पैसे देत असतानाही महापालिका मुख्याध्यापिकेलाच उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतले. ‘स्पर्श’ खासगी हॉस्पिटलशी सेटिंग करून रुग्णांकडून पैसे उकळत आहेत.
***
कोण नगरसेवक धंदा करीत आहेत : योगेश बहल
राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल म्हणाले, स्पर्शने खासगी हॉस्पिटलशी सेटिंग करून बेडसाठी पैसे घेतले. तिथे रुग्णांची लूट केली जाते. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. हे प्रकरण मिटविण्यासाठी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके हे कुंदन गायकवाड यांना समजविण्यासाठी गेले होते. हे प्रकरण ऍडजस्ट करण्यासाठी 15 ते 20 लाख देण्याची तयारी दर्शविली होती. स्पर्शच्या भ्रष्टाचाराला भाजपने पाठिंबा दिला. ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा. कोण नगरसेवक चालवत आहे, धंदा करत आहे हे कळेल. लोकांचे जीव घेऊन पैसे कमविण्याचे काम केले जात आहे, असेही योगेश बहल यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button