breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘जरंडेश्वर’ची माहिती देण्यास सातारा जिल्हा बँकेचा उदयनराजेंना नकार

मुंबई |

जरंडेश्वर कारखान्याला जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची आणि ईडीच्या चौकशीची लेखी माहिती जिल्हा बँकेचे संचालक खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे मागितली होती. ईडीने जी काही माहिती मागविली होती ती ईडीला देण्यात आली आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत संचालक मंडळाने उदयनराजे भोसले यांना ही माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता खासदार उदयनराजे भोसले आणखी आक्रमक होत कोणती काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सद्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. सत्ताधारी सर्व पक्षीय पॅनेलमध्ये खासदार उदयनराजे ,रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांना उमेदवारी देण्यास अनेकांनी नकार दिला आहे. उदयनराजेंना सत्ताधारी पॅनल मधून उमेदवारी मिळाल्यास या निवडणुकीमध्ये सहज विजय मिळू शकतो. मात्र निवडणूक लागल्यास सगळे विरोधक एकवटण्याची शक्यता आहे त्याचा फटका उदयनराजेंना बसण्याची शक्यता आहे.

त्यामुळे उदयनराजेंनी या कर्ज प्रकरणावर आक्षेप घेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती मागितली होती. यावेळी सरकाळे यांनी हा विषय २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकारी समितीपुढे ठेवण्यात येईल आणि त्यानंतरच आपल्याला उत्तर दिले जाईल असे सांगितले होते. शुक्रवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि यावेळी उदयनराजेंनी मागणी केलेल्या लेखी पत्रावर चर्चा झाली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर संचालक मंडळाने कोणतेही भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे याबाबत काहीही माहिती देता येणार नाही. मात्र, आपल्याला जी माहिती हवी आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील निर्णय संचालक मंडळांकडून घेण्यात येईल असे सांगण्यात आले. सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्याला दिलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती किरीट सोमय्या व डॉ शालिनीताई पाटील यांनी ईडीकडे केलेल्या तक्रारी नंतर बँकेकडे मागितली होती. त्याप्रमाणे माहिती देण्यात आल्याचे बँकेने उदयनराजेंनी याबाबत माहिती मागितल्या नंतर स्पष्ट केले होते. जरंडेश्वर शुगरची कर्ज मागणी, कर्जपुरवठा, जिल्हा बँकेची भूमिका, ईडीच्या नोटिस यासर्व प्रकारामुळे बँकेची नाहक बदनामी झाल्याचे सांगत व निवडणुकीत त्यांना सत्ताधारी पॅनल मध्ये घेण्यास अनेकानी विरोध केल्यानंतर या एकूणच प्रकरणावर आक्षेप घेत उदयनराजेंनी बँकेकडे माहिती मागविली होती.

उदयनराजे शुक्रवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी बँकेत आले होते आणि लवकर बाहेर पडले. त्या वेळी विधानपरिषदेचे सभापती व मार्गदर्शक जेष्ठ संचालक रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, नितीन पाटील आदी संचालक उपस्थित होते. मात्र यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उशिरा बैठकीसाठी आले. या बैठकीत उदयनराजेंनी मागितलेली माहिती देण्यास नकार देण्यात आला. ईडीने जी काही माहिती मागविली होती ती ईडीला देण्यात आली आहे, तसेच हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे संचालक मंडळाला त्यावर मत व्यक्त करता येणार नाही. उदयनराजेंनी मागितलेली माहिती योग्य, की अयोग्य हे संचालक मंडळाला ठरविण्याचा अधिकार नाही. उदयनराजेंच्या मागणीवर कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले. बँकेची निवडणूक उदयनराजेंची वेळोवेळी बदलणारी भूमिका यावर कोणतेही जास्त भाष्य न करता बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी घेतलेली कठोर भूमिका बरेच काही सांगून जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button