TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दोन वर्षानंतर होणार संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पिंपरी चिंचवड | कोरोना साथीमुळे मागील दोन वर्ष संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा सार्वजनिकपणे साजरा झाला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर संजीवन समाधी सोहळा सार्वजनिकपणे साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच पीएमपीएमएल प्रशासनाने आळंदी मार्गावर शहराच्या विविध भागातून ज्यादा बस सोडल्या आहेत.येत्या गुरुवारी (दि. 2 डिसेंबर) आळंदी येथे संत ज्ञानेश्वर माउली महाराज संजीवन समाधी सोहळा होणार आहे. दोन वर्षानंतर हा सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आळंदीला भेट देऊन मंदिर परिसराची पाहणी केली आहे. वारकरी, प्रशासन अधिकारी, कर्मचारी, पोलीस बंदोबस्त यांचे नियोजन करण्यात आले आहे.

कोविडचे संकट अजून टळलेले नाही याचे भान राखून आरोग्य, आपत्तीव्यवस्थापन, महावितरण, पोलीस, नगरपालिका, पंचायत समिती आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच वयस्क व सहव्याधी असलेल्या भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्यादृष्टीने यात्रेत सहभागी होण्याचे टाळावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

संजीवन समाधी सोहळ्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. तसेच कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन व्हावे म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे. यासाठी दोन पोलीस उपायुक्त, सात सहाय्यक पोलीस आयुक्त, 62 पोलीस निरीक्षक, 182 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, 1700 पोलीस कर्मचारी, 800 होमगार्ड एवढा बंदोबस्त संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान लावण्यात आला आहे.

मंदिरात जाणा-या प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच सर्व नागरिकांनी देखील मास्क घालणे आवश्यक आहे. रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था केली जात आहे. प्रत्येक नागरिकावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. सोहळ्यात पोलीस, सीसीटीव्ही, ड्रोनचा वॉच असणार आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) देखील या काळात तैनात केले जाणार आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button