breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरुन टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना संजय राऊतांनी सुनावलं; म्हणाले…

मुंबई |

मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून विरोधकांनी चिंता करु नये असा टोला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संजय राऊत यांनी शिवाजी पार्कात स्मृतीस्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच भाजपा नेत्यांवरही निशाणा साधला. विरोधी पक्षानं विधायक काम करायचं ठरवलं तर उत्तम काम करतील असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“बाळासाहेबांच्या आठवणी एका व्यक्तीच्या नाही तर संपूर्ण देश आणि महाराष्ट्राच्या मनात आहेत. बाळासाहेब हाच महाराष्ट्राचा आत्मा होता आणि आजही आहे. आज दिसणारा अखंड, शक्तिमान आणि स्वाभिमानी महाराष्ट्र हे बाळासाहेब ठाकरेंचं योगदान आहे. आज आम्ही सगळे या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर स्वाभिमानाने, आत्मविश्वासने मराठी असल्याचं सांगतो. हा आत्मविश्वास बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आम्ही देशात हिंदू असल्याचं सांगतो, ही अस्मिताही त्यांनीच दिली. बाळासाहेब ठाकरेंनी या देशाला जगाच्या नकाशावर हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करुन दिली. ते एक महान व्यक्तिमत्व होतं. असे बाळासाहेब ठाकरे पुन्हा जन्माला येणार नाहीत. ते एकदाच जन्माला आले आणि आजही अमर आहेत. आम्ही काय करतो यावर त्यांचं लक्ष आहे, म्हणूनच आम्ही शिस्तीत आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तब्येत अत्यंत उत्तम आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांना त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे, त्याच्याविषयी ते काहीतरी वक्तव्यं करत असतात. हे विरोधी पक्षाच्या बिघडलेल्या प्रकृतीचं लक्षण आहे”.

  • उद्धव ठाकरे शिवसैनिकाशी संवाद साधणार…

“आज मुख्यमंत्री शिवसैनिकांशी संवाद साधतील. बाळासाहेब आज आपल्यात नसले तरी आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत असतो. मुख्यमंत्री तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राशी संवाद साधतील आणि शिवसेनेच्या राजकारणातील पुढील दिशेची भूमिका मांडतील,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

भाजपा नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार बर्खास्त करण्याची मागणी केली आहे. यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “करु द्या ना…असं आहे की, त्यांचा वेळ जात नाही. पुढील तीन वर्ष त्यांना हेच करायचं आहे. सरकारला दोन वर्ष झाली असून उत्तम सुरु आहे. पुढील तीन वर्ष अजून चालेल. विरोधी पक्षाकडे काही काम नाही. खरं तर त्यांच्याकडे मोठी ताकद आहे, त्यांनी जर विधायक काम केलं तर ते लोकशाहीत उत्तम काम करु शकतात. पण वेल घालवण्यासाठी त्यांच्याकडे दुसरं काहीच साधन नसल्याने अशा प्रकारचे उद्योग करत असतात. त्यात त्यांनी राजभवनालाही सामावून करुन घेतलं आहे”.

निवडणूक प्रचारावरील बंदी वाढवण्यात आल्यासंबंधी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “ही भाजपाची सोय आहे असं मला वाटतं. बहुतेक त्यांच्या सभांना गर्दी जमणार नाही. पंतप्रधानांच्या उत्तर प्रदेश किंवा पंजाबमधील सभांना अजिबात गर्दी जमली नव्हती असं सांगतात. त्यामुळे त्यांची सोय आहे का हे थोडं तपासून पाहिलं पाहिजे”.

  • “गोव्यात भाजपाला बहुमत मिळणार नाही”

संजय राऊतांनी यावेळी गोव्यात भाजपाला बहुमत मिळणार नाही, मी लिहून देतो असं म्हटलं. बहुमत न मिळणं आणि सरकार स्थापन करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जनतेने नाकारल्यानंतरही तुम्ही सरकार स्थापन केलं तर हे लोकशाहीच्या विरोधात असेल असं राऊत म्हणाले. गोव्यात शिवसेना १२ आणि राष्ट्रवादी साधारण सात किंवा आठ जागांवर लढेल अशी माहिती संजय राऊतांनी यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button