breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

संजय राऊतांचा बदलला सूर अन् नूर! भाजपाबद्दल चकार शब्द नाही, लक्ष्य फक्त शिंदे गट!!

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची काल जामीनावर सुटका झाली. त्यांचे शिवसैनिकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, त्यांनी भाजपाबद्दल चकार शब्द काढला नाही. एवढेच नव्हे तर, आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 102 दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर संजय राऊत यांचा हा बदललेला सूर आणि नूर सर्वांनाच बुचकाळ्यात टाकणारा आहे.

ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खासदार संजय राऊत हे त्यांच्या भांडुप येथील घरी रात्री उशिरा दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी भांडुप येथील निवासस्थानी शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. ते तुरुंगातून बाहेर आल्याने आता भाजपा आणि शिंदे गट विरुद्ध संजय राऊत असा सामना रंगणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. सोशल मीडियावर देखील तशाच प्रतिक्रिया उमटत होत्या.

गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घ्यायचा अधिकार नाही
भांडुपला शिवसैनिकांना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये शिवसेना तोडण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण ती तुटलेली नाही. ही अभेद्य शिवसेना आहे, हे अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या विजयाने दाखवून दिले. मशाल भडकलेली आहे. एकच शिवसेना महाराष्ट्रात राहील. ती म्हणजे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. गद्दारांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई महानगरपालिका, मुंबई आपल्या हातातून काढून घेण्यासाठी शिवसेना फोडली आहे हे लक्षात घ्या, असे ते म्हणाले.

…बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया
शिंदे गटाचा मिंधे गट असा उल्लेख करून ते म्हणाले, शिवसेना एकच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरेंचे नेतृत्व असलेली शिवसेनाच खरी शिवसेना आहे. बाकी सगळ्या धोत्र्याच्या कडू बिया आहेत,. ही मुंबई आणि महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे, ते लवकरच कळेल, असेही ते म्हणाले.

वर्षा राऊतांकडूनही भाजपाचा उल्लेख नाही
संजय राऊत यांची जामीनावर मुक्तता झाल्यावर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी आनंद व्यक्त केला. आम्हाला खूप आनंद झाला आहे. साहेब कधी येणार याची वाट पाहतोय. खूप लोकांचे फोन आले. त्यांची अभिनंदन व्यक्त केले आहे, असे त्या म्हणाल्या.

कुठे गेला आक्रमकपणा?
खासदार संजय राऊत यांनी काल शिंदे गटावर केलेल्या टीकेमुळे उद्यापासून त्यांचा आक्रमकपणा पाहायला मिळेल, असे सर्वांनाच वाटले. पण खासदार संजय राऊत आज सकाळी पत्रकारांना सामोरे गेले, त्यावेळी ते नेहमीच्या आक्रमक शैलीत भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल करतील असे वाटत होते. मात्र, त्यांची सुरुवातीपासूनच भाषा मवाळ होती. ईडी किंवा ज्यांनी-ज्यांनी हे कटकारस्थान रचले त्यावर मी टिप्पणी करणार नाही. त्यांना जर यात आनंद मिळाला असेल तर, मी सुद्धा त्यांच्या आनंदात सहभागी आहे, हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले. त्यामुळे त्यांचा आक्रमकपणा कुठे गेला, असा प्रश्न सर्वांनाच पडला.

फडणवीसांची भेट घेणार
राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले आहेत, त्यांचे मी स्वागत करतो. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, असे कौतुक करत, आपण त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिंदे गटाला शह देण्याची रणनीती ठाकरे गटाची आहे का, अशी चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल आपुलकी
मी जेलमध्ये असताना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सातत्याने माझी आणि माझ्या कुटुंबीयांची चौकशी करत होते. शरद पवार यांची तब्येत ठीक नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचीही आपण भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेपासून लांब
सध्या महाराष्ट्रात खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. सध्या ती नांदेडमध्ये आहे. त्यात तुम्ही सहभागी होणार का, असे विचारले असता संजय राऊत यांनी नकार दिला. तब्येत ठीक असती तर, आपण सहभागी झालो असतो, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, या यात्रेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार नाहीत.

केला इशारा जाता जाता
तुम्ही भाजपामध्ये सहभागी झालात तर, तुमच्याविरुद्धची सर्व प्रकरणे बंद केली जातील, अशी ऑफर देण्यात आल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. तसा तुमचा काही अनुभव आहे का, असे एका पत्रकाराने विचारले असता, त्याबद्दल ‘मी यासंदर्भात लवकरच बोलेन,’ असे संकेत त्यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button