Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

संजय राऊतांना अटक, शिवसेनेचा ‘आवाज’ आता कोण मांडणार? मातोश्रीवर फैसला

मुंबई : गेल्या अडीच वर्षात मोदी सरकारच्या विरोधात शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडत शिवसेना खासदार संजय राऊत भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांविरोधात कायम टीका करत आले आहेत. मात्र काल मध्यरात्रीच्या सुमारास संजय राऊत यांना ईडीने अटक केली. १२०० कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सतरा तास झाडाझडती केल्यानंतर ईडीने त्यांच्यावर कारवाई केली. यानंतर आता शिवसेनेची भूमिका कोण मांडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रश्नाचं उत्तर आज काही तासांतच मिळणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून धुरा कोण सांभाळणार, याचा निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी एक वाजता शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या संजय राऊत यांच्यासह अरविंद सावंत यांच्या शिवसेनेचं मुख्य प्रवक्तेपद आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते कोण कोण?

२०२१ च्या यादीनुसार शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?

संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अ‍ॅड. अनिल परब – विधानपरिषद आमदार
सचिन अहिर – शिवसेना उपनेते, विधानपरिषद आमदार
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे) – शिंदे गटात
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी)
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना)
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार
किशोरी पेडणेकर – माजी महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – माजी नगरसेविका (मुंबई) – शिंदे गटात
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई)
किशोर कान्हेरे (नागपूर)
संजना घाडी
आनंद दुबे (मुंबई)

नव्या यादीत कोणाला स्थान दिलं नव्हतं?

डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद उपसभापती
धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर) – शिंदे गटात
गुलाबराव पाटील – माजी मंत्री – शिंदे गटात
उदय सामंत – माजी मंत्री – शिंदे गटात

सुनील राऊत यांचा गंभीर आरोप

मी संजय राऊत यांना भेटलो, ते ओके आहेत, बिनधास्त आहेत. त्यांना काही टेन्शन किंवा भीती नाही. त्यांच्या घरात दहा लाख रुपयांची जी कॅश सापडली, त्याच्यावर ज्यांनी ताबा घेतला, त्यावेळी लिहिलं होतं अयोध्या आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde). शिवसेना नेते अयोध्याला गेले होते, त्याचं हे काँट्रिब्युशन होतं, ते पक्षाचे पैसे आहेत आणि पक्ष कार्यालयात जमा होणार होते. आम्ही न्यायालयीन लढाई लढणार. तुम्ही रामायण-महाभारत बघा, सत्याचाच विजय होतो. संजय राऊत यांना काही दिवसात न्याय मिळेल, भाजप राऊतांना घाबरली म्हणून अटक केली, असा गंभीर आरोपही संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीत मोलाचा वाटा

भाजप आणि शिवसेना यांच्यात हिंदुत्वाचा समान धागा आहे. तथापि, केंद्र व राज्यातील सत्तावाटपाच्या प्रश्नावरून युतीमधील संबंध ताणले गेले होते. परिणामी अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या सत्तेतून भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील महाविकास आघाडीचे जनक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे होते. पवार यांच्या त्या प्रयोगाला साथ देण्याचे काम शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी नेटाने केले. संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा शरद पवार आणि राष्ट्रवादीचा कार्यक्रम राबवत असल्याचा आरोप बंडखोर शिंदे गटातील आमदार, खासदारांचा आहे. शिवसेनेतील काही जुन्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.

भाजप, शिवसेना यांच्यातील जुन्या युतीमध्ये बिघाड निर्माण करण्यात संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा, ताठर भूमिका कारणीभूत ठरल्याचे शिवसेनेतील काही जणांना वाटते. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वैचारिक भूमिका, शिवसेनेच्या सत्ता संतुलनाच्या कामात संजय राऊत यांनी पक्षाच्या मुखपत्रातून, सोशल मिडिया, न्यूज चॅनेलमधून स्पष्ट भूमिका मांडण्याचे चांगले काम केले असल्याची भावनाही शिवसेनेत आहे.

शिवसेनेतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. ईडीचे समन्स, चौकशांचे शुक्लकाष्ठ लागले असताना पक्ष म्हणून शिवसेनेने ठाम भूमिका घेतलेली दिसत नव्हती. आता संजय राऊत यांच्यासाठी अपवाद कशासाठी करायचा अशी संमिश्र भूमिका शिवसेनेत दिसते. अर्थात, शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश हा खूप महत्त्वाचा असतो. संजय राऊत यांच्या विरोधातील ईडी कारवाईचा प्रखर निषेध करण्यासाठी याघडीस तरी पक्षप्रमुखांना आंदोलनाचा आदेश दिलेला नाही. हे जरी खरे असले तरी शिवसेनेची मराठी अस्मिता, मराठी माणसांचे हक्क, हिंदुत्व आणि प्रसंगानुरूप थेट स्पष्ट राजकीय भूमिका मांडण्याचे कसब खा. संजय राऊत यांच्या अंगी होते. आता राऊत चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याने त्यांची भूमिका नेटाने कोण पार पाडणार असाही प्रश्न शिवसेनेपुढे आहे असे सेनेच्या वर्तुळात बोलले जाते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button