breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दु:खद! सदाभाऊ खोतांवर दु:खाचा डोंगर, मिठी मारणारी बहीण मिठीतून कायमची निघून गेली

मुंबई : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या भगिनीने काल (गुरुवारी) रात्री जगाचा निरोप घेतला आहे. मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून कायमची निघून गेली, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. ‘तायडे माझ्या मिठीतून तू अशी निघून का गेलीस?’ असा काळीज चिरणारा सवाल त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात सध्या राज्यसभा-विधान परिषद निवडणुकांची धामधूम सुरु आहे. सगळे राजकीय नेते राजधानी मुंबईत आपापल्या आमदारांसोबत आहेत. सदाभाऊ खोत यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष म्हणून विधान परिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. सदाभाऊ खोतांची मतांची बेगमी सुरु असतानाच त्यांना बहीण गेल्याची बातमी कळाली अन् खोतांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

मरळनाथपूर या छोट्याशा गावामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. इवलसं गाव, डोंगर कपारीमध्ये असणारी शेती. उन्हाळा आला की सगळं बोखाडमाळ डोळ्यासमोर पाहायला मिळायचं. रानामध्ये जनावरांच्या मागं आम्ही भावंड गेलो की पायामध्ये सड, बोराडीचा काटा आणि अनेक काटे कुटे घुसायचे. घरात आलं की काटा घुसलेल्या पायाला बिब्याचा नाहीतर गुळाचा चटका दिला जायचा. पाय बांधला जायचा आणि दुसऱ्या दिवशी काटा काढला जायचा. काटा जरी काढलेला असला तरी कळ मारावी म्हणून बिब्याचा चटका दिलेला असायचा. सणावाराला कधीतरी पुरणपोळी खायला मिळायची. चपातीने तर कधी आम्हाला तोंड दाखवलं नव्हतं. काळी पडलेली हायब्रीड ज्वारीची भाकरी ही आमच्या ताटात असायची. भात कधीतरी नवसालाच असायचा. अशा सगळ्या गरिबीमध्ये हा चाललेला प्रपंचाचा गाडा. गाई म्हशीचं दूध दुभतं फक्त मात्र घरात भरपूर असायचं. दूध भाकरी खायचा एक वेगळाच गोडवा मनामध्ये राहायचा. तीन चुलते त्यांची मुलं… असं नाही म्हटलं तरी आमचा सगळा पंधरा-सोळा माणसांचा खटला होता.

घर मात्र एक लहानसं खुराडं होतं. गरिबीनं मोठं घर बांधायला सुद्धा उसंत दिलेली नव्हती. कालांतराने घरातली आम्ही बहिणी भावंडं मोठी झालो. राहायला मग आम्ही शेतामध्ये घर बांधायचा निर्णय घेतला. पालाच्या घरामध्ये काही दिवस राहिल्यानंतर दोन चुलते मुंबईला आले. मुंबईल कमावलेला पैसा जमवून दगड मातीचं कौलारू घर शेतामध्ये उभं राहिलं. उभ्या राहिलेल्या घरामध्ये आम्ही बहिणी भावंड राहायला लागलो. त्या घराशेजारी माळरानावर आजूबाजूला कुणाचंही घर नव्हतं. एकमेवं घर होतं ते आमचं होतं. दिवस उजाडला कि आम्हाला हायसं वाटायचं. रात्री चोरा चिलटांचं भय असायचं. अशा या भीतीच्या छायेखालीच आम्ही लहानाचे मोठे झालो. पाहुणा पै आला तरच सोबत असायची. अशा दारिद्यात कधी भाजीला तेल आहे तर कधी चटणी नाही. कधी भाजीऐवजी ठेचा तर कधी लाल मिरचीची चटणी आणि बुक्का असं बेताचंच आमचं राहणीमान होतं. रानातल्या पालेभाज्या खाऊन आम्ही धडधाकट होतो. ह्या गरिबीमध्ये कधी श्रीमंतीचं वारं सुद्धा कधी आम्ही पाहिलं नसल्यानं आम्ही बहिणी भावंडं आनंदाने एकत्र राहत होतो. ह्या दारिद्याचं ओझं घेऊन जगलो. ह्या दारिद्र्यामध्येच माझ्या बहिणीचं लग्न झालं.

४ जूनला तिच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं. त्यावेळेस ती मुंबईलाच होती म्हणून तिला मुंबईतच एका छोट्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि तिला हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं. मी कांदा परिषदेला नाशिकच्या दौऱ्यावर होतो. मला चुलत भावाचा फोन आला की रुक्मिणीची तब्येत बिघडली तर आता काय करावं. डॉक्टर म्हणतात कि इथं ऑपरेशन होत नाही. लगेच मी तिला के. ई. एम हॉस्पिटल मुंबईमध्ये घेऊन यायला सांगितलं आणि लगेच मी कार्यक्रम आटपून धावतपळत मुंबईला बहिणीजवळ आलो आणि तिला गुच्छ दिला आणि म्हणालो तुला लवकर बरं करायचं आहे. चेहऱ्यावर माझ्या बहिणीच्या हसू खुललं. अन तसं बहिणीनं अंथरुणावर उठून माझ्या कंबरेला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर माझे डोळे पाणावले. ही वेड्या बहिणीची वेडी माया. आता वाटलं ही लवकर बरी होईल. त्यानंतर सकाळी डॉक्टरांशी बोललो उद्याच्याला ऑपरेशनला घ्यायचा निर्णय झाला. ८ जून २०२२ ला मी दुपारी कामानिमित्त बाहेर आलो आणि दुपारी मला भाच्याचा फोन आला. भाऊ धाप वाढलीय तुम्ही लगेच दवाखान्याकडे या. मी तात्काळ दवाखान्याकडं धावत पळत गेलो. आणि तिच्याकडे गेलो असता माहित झालं की मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेलेली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button