TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

गोवरमधून बरे झाल्यानंतरही एक महिन्यापर्यंत धोका

मुंबई : गोवरची लागण झालेले बाळ बरे झाले तरी पुढील साधारण एक महिना त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या महिनाभरात त्याला अन्य आजारांची लागण होण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला. गोवरमधून बरे झालेल्या बाळांना पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसमोर गोवर रुग्णांबरोबरच त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

लसीकरण न झालेल्या, रक्तक्षय आणि कुपोषित असलेल्या बालकांना गोवरची लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. या आजाराची लागण झाल्यानंतर बाळाची प्रतिकारशक्ती कमी होते. औषधोपचाराने बाळ बरे झाले तरी त्याची प्रतिकारशक्ती लगेचच पूर्ववत होत नाही. यासाठी साधारणपणे महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे गोवरमधून बरे झालेल्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला व अन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. बरे झालेल्या रुग्णांची साधारणपणे किमान एक महिना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या कालावधीमध्ये बाळाकडे किंवा त्याच्या पोषणाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याला अन्य आजार होण्याची शक्यता आहे. तसेच हे आजार त्याला अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोवरमधून बरे होणाऱ्या बाळांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील एक महिना फारच महत्त्वाचा असतो, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button