breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढता मृत्युदर, मर्यादित बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता ठरतेय घातक..

पिंपरी महाईन्यूज

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्युदराचा वाढता आलेख, मर्यादित बेड, व्हेंटिलेटर, अपुरे रेमडेसिवीर इंजेक्शन आदींची कमतरता पालिकेच्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान ठरू पाहत आहे. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य व गोरगरीब कोविड १९ रुग्णांना बसत आहे. महापालिकेने कोरोना या भुताचे थैमान रोखण्यासाठी २४ तास आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करावी. वाढते मृत्युदर, व रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, त्यासाठी शहर मनसेचे पालिका प्रशासनाला संपूर्ण सहकार्य राहील. मात्र, कर्तव्यात कुसूर केल्यास मनसेकडून योग्य धडाही दिला जाईल, असा सज्जड इशारा पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालिका आयुक्त व आरोग्य यंत्रणेस दिला आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. विविध उपनगरात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. त्यामुळे शहरात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, कोरोनामुळे बेडअभावी मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होत आहे. १ एप्रिल ते १० एप्रिल या दहा दिवसांच्या कालावधीत २५ हजारांपेक्षा अधिक सक्रीय कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत. तर, १९२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दिवसाला २२०० ते २३०० रुग्ण वाढत आहेत.

करोना प्रतिबंधासाठी एकीकडे रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयोगी पडत असले तरी, इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. पालिका, अन्न व औषध प्रशासनाने या इंजेक्शनची उपलब्धता आहे, असा दावा केला असला तरीही प्रत्यक्षात मात्र, या इंजेक्शनची उपलब्धता सुरळीत नाहीच. या इंजेक्शनचा काळा बाजार रोखण्यासाठी तसेच गरजू रुग्णांना रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याची निकड भासू लागली आहे. तर दुसरीकडे रुग्ण व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने हॉस्पिटलच्या दारोदार फिरत आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडून व्हिडीओच्या माध्यमातून मदतीची मागणी करण्यात येत आहे. यापैकी व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या बेडची संख्या नगण्य आहे. सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. राज्याच्या इतर भागातूनही शहरात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याचे दिसतेय. कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास गोरगरिबांनी कुणाच्या तोंडाकडे पहायचे. त्यासाठी आयुक्तांनी आपला अनुभव पणाला लावून शहरावर आलेले कोरोनारूपी राक्षसाचे संकट परतवून लावण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करावी, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button