ताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रोच्या ‘बुधवार पेठ’ आणि ‘आयडियल कॉलनी’ स्थानकांचे नामांतर

प्रतिनिधी, पुणे

पुणे मेट्रोच्या ‘बुधवार पेठ’ आणि ‘आयडियल कॉलनी’ स्थानकांचे नाव बदलून अनुक्रमे ‘कसबा पेठ’ आणि ‘पौड फाटा केले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कर्पोरेशनने (महामेट्रो) त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारसह केंद्र सरकारकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यानंतर या स्थानकांची नावे बदलण्याची अधिसूचना काढण्यात येणार आहे.

पुणे मेट्रोसाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार केला होता. ‘डीपीआर’मध्ये ‘डीएमआरसी’ने मेट्रो स्थानकांसाठी नावे निश्चित केली होती. त्यामध्ये पिंपरी ते स्वारगेट मार्गिकेवर ‘भोसरी’ आणि ‘बुधवार पेठ स्थानक’ अशी नावे दिली होती. त्यानंतर, बुधवार पेठ स्थानकाचे ठिकाण बदलण्यात आल्याने त्या नावात बदल करणे गरजेचे होते. तर, प्रत्यक्षात भोसरी हे उपनगर मेट्रोच्या भोसरी स्थानकापासून दूर असल्याने त्यात बदल करण्याची गरज होती. वनाझ ते रामवाडी मार्गिकेवरील ‘आयडियल कॉलनी’ स्थानक पौड फाटा, केळेवाडी या ठिकाणी आहे; परंतु, आयडियल कॉलनी या स्थानकापासून काही अंतरावर आहे. त्यामुळे या स्टेशनचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती.

मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर स्थानकांच्या चुकलेल्या नावांबाबत सामान्य नागरिकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महामेट्रो प्रशासनाने ‘बुधवार पेठ स्थानक’ आणि ‘आयडियल कॉलनी’ स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठविला आहे. सरकारच्या मान्यतेशिवाय ही नावे बदलली जाणार नाहीत, अशी माहिती ‘महामेट्रो’चे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ यांनी ‘मटा’ला दिली.

”महामेट्रो’ प्रशासनाने दोन स्थानकांची नावे बदलण्यासाठी प्रस्ताव पाठविला असला तरीही ‘भोसरी’ स्थानकाचे नाव बदलण्यासाठी प्रस्ताव अद्याप पाठविलेला नाही. ‘भोसरी’ स्थानक नाशिक फाटा येथे आहे. तेथून भोसरी सुमारे दहा किलोमीटरवर आहे. तसेच, ‘भोसरी’ स्थानकाशेजारीच मध्य रेल्वेचे कासारवाडी स्थानक आहे. त्यामुळे ‘भोसरी’ स्थानकाबाबत सामान्य नागरिकांचा गोंधळ उडत आहे. ‘मेट्रो’चे ‘कासारवाडी’ स्थानक आणि रेल्वेचे ‘कासारवाडी’ ही दोनही स्थानके वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. दरम्यान, विविध ठिकाणी ‘भोसरी’ स्थानकाचा उल्लेख करताना त्यासोबत नाशिक फाटा असा उल्लेख करण्यात आला आहे,’ असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी ‘डीपीआर’ करणाऱ्या कंपनीने स्थानकांची नावे निश्चित केली आहेत. काही स्थानकांची नावे चुकली आहेत, तर काही ठिकाणी स्थानकाचे ठिकाण बदलले आहे. त्यामुळे बुधवार पेठ स्थानकाचे ‘कसबा पेठ’ आणि आयडियल कॉलनी स्थानकाचे ‘पौड फाटा’ असे नामकरण करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे.

– अतुल गाडगीळ, संचालक (प्रकल्प) महामेट्रो

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button