ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

15 दिवसांत होर्डिंग काढून टाका, अन्यथा सांगाडा उभारणारे, जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा – आयुक्त

पिंपरी चिंचवड | महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने पिंपरी – चिंचवड शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण केले आहे. त्यात महापालिकेच्या 109 जागांवर 118 अनधिकृत होर्डिंगचे सांगाडे आढळून आले आहेत. ते उभारणाऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. पंधरा दिवसांत होर्डिंग काढून टाकावेत. अन्यथा सांगाडा उभारणारे आणि त्यावर जाहिरात करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.महापालिकेची परवानगी न घेता शहरातील रस्ते, उद्याने, पदपथ, क्रीडांगणे, स्मशानभूमी, नाले अशा अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग लावले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट होत असून मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याला आळा घालण्यासाठी आणि शहराच्या सौंदर्यात आणि महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण आणण्याचा आदेश आयुक्तांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाला दिला आहे.

त्यानुसार परवाना निरीक्षकांनी सर्व्हे करून अनधिकृत जाहिरात फलक शोधून काढले आहेत. त्यातील महापालिकेच्या जागेत अनधिकृत फलक लावणारे व त्यावर जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर खासगी जागेत विनापरवाना उभारलेल्या फलकांवर कारवाई केली जाणार आहे, असे फलक सुमारे दोन हजार असण्याची शक्यता सर्व्हेक्षणात आढळून आली आहे.अनधिकृत जाहिरात फलक, फलक उभारणाऱ्या व्यक्ती व संस्था, त्या माध्यमातून जाहिरात करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अनधिकृत फलक ताब्यात घेऊन ते नष्ट केले जाणार आहेत. असे जाहिरात फलक पंधरा दिवसांत संबंधितांनी काढून टाकावेत अन्यथा महाराष्ट्र महापालिका अधिनियम, मुंबई प्रांतिक महापालिका जाहिरात व फलक नियंत्रण अधिनियम, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, शहरात अधिकृतची ठिकाणे 1121 आहेत. त्यात अधिकृत होर्डिंग 1769, अनधिकृतची ठिकाणे 109 आणि अनधिकृत होर्डिंग 118 आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button