मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख भोवली : 39 लाखांची फसवणूक करत महिलेवर केला बलात्कार
पिंपरी l प्रतिनिधी
भारत मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने महिलेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 38 लाख 82 हजार रुपये घेतले. त्या पैशांबाबत महिलेने विचारणा केली असता व्यक्तीने दारू पिऊन महिलेच्या घरी येऊन तिच्यावर बलात्कार केला. घडल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास महिलेच्या भावाला जीवे मारण्याची तसेच महिलेचे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार सन 2017 ते 28 डिसेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडला.
सचिन भाऊसाहेब गुंजाळ (रा. दौने गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर), श्रीकांत नरेंद्र राजे (रा. न-हे गाव, पुणे), अभिजित पवार (रा. वाकड) यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे 2017 मध्ये भारत मेट्रोमोनीयल या लग्नाच्या संकेतस्थळावरून फिर्यादी महिलेची आरोपी सचिन याच्यासोबत ओळख झाली. सचिन याने लग्नाचे आमिष दाखवून पेट्रोल पंपाचे लायसन्स काढण्यासाठी फिर्यादी यांना बजाज फायनान्समधून पाच लाख 30 हजारांचे कर्ज काढण्यास प्रोत्साहित केले. सन 2018 मध्ये सचिन याचा भाऊ सागर गुंजाळ याच्या आयटी रिटर्नचा प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगून फिर्यादीकडून पाच लाख 95 हजार रुपये रोख रक्कम घेतली.
आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला बिजनेस प्रपोजल सांगून पार्टनरशिप फर्म प्रोसिडिंग करता फिर्यादी यांच्या को-या कागदावर सह्या घेतल्या. हॉटेल व्यवसायासाठी म्हणून फिर्यादी यांना दोन बँकांमधून 15 लाख रुपयांचे कर्ज काढण्यास प्रोत्साहित केले. अन्य कारणांसाठी फिर्यादीकडून सहा लाख रुपये घेतले. आरोपी श्रीकांत याने एकट्याच्या नावाने रावेत येथील हॉटेलचा करारनामा केला. 27 जानेवारी 2021 रोजी हॉटेलचा ताबा घेऊन फिर्यादी यांची एकूण 38 लाख 82 हजार 600 रुपयांची फसवणूक केली.
7 फेब्रुवारी 2021 रोजी आरोपी सचिन दारू पिऊन फिर्यादी यांच्या घरी आला. फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांबाबत त्यांनी विचारणा केली असता आरोपी सचिन याने फिर्यादीवर जबरदस्तीने अनैसर्गिक संभोग केला. घडल्या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास फिर्यादी व त्याच्या भावाला मारण्याची धमकी दिली. शरीर संबंधाच्या वेळी काढलेले फोटो सचिन याच्याकडे असून ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.