TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

परिचारिका प्रवेशासाठी नव्याने नोंदणीची गरज

नवे वेळापत्रक आज जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीनंतर औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेऐवजी बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या चार विषयांच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हा निर्णय देताना पहिल्या फेरीमध्ये झालेले जवळपास १२०० प्रवेश न्यायालयाने सुरक्षित ठेवत अन्य विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

‘प्रायव्हेट नर्सिग स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन’ने बीएस्सी नर्सिग अभ्यासक्रमाची पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्याची मागणी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली आहे.

परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेची पात्रता रद्द करण्याचा राज्य सामायिक प्रवेश परीक्षेला  न्यायालयाने दिलेले आदेश योग्य आहे. तसेच बीएस्सी नर्सिग अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश घेण्याची मागणी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली असल्याची माहिती ‘प्रायव्हेट नर्सिग स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार  यांनी सांगितले.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाविद्यालयांचे प्राचार्य, पालक आणि विद्यार्थी यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी रविवारी ‘भारतीय परिचर्या परिषद आणि प्रायव्हेट नर्सिग स्कूल अँड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन’च्या माध्यमातून चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते.

एप्रिलमध्ये भारतीय परिचर्या परिषदेने राज्याने १०० गुणांची अभियोग्यता चाचणी किंवा नीटचे ५० पर्सेटाइल किंवा त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतात, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र राज्याने १०० गुणांची अभियोग्यता चाचणी घेण्याऐवजी नीटमार्फत परीक्षा घेण्याला प्राधान्य दिले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याने राज्यातील महाविद्यालयाने परिषदेच्या सूचनेनुसार प्रवेश करण्यासंदर्भात १६ जून रोजी राज्य सरकारकडे विनंती केली होती. त्या अनुषंगाने आम्ही न्यायालयात धाव घेत महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याची माहिती पवार यांनी दिली.

राज्यामध्ये परिचारिका अभ्यासक्रमासाठी ६ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. यातील पहिल्या फेरीत जवळपास १ हजार २०० प्रवेश झालेले आहेत. त्यामुळे उर्वरित जागा या न्यायालयाच्या निर्णयानुसार भरण्यात येतील. या संदर्भातील प्रवेशाचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सोमवारी जाहीर करण्यात येईल, तसेच नव्याने नोंदणी करणे गरजेचे असेल, असे पवार यांनी सांगितले.

नीट प्रवेश प्रक्रियेत ५० पर्सेटाईल गुण मिळवण्याचा निकष हा विद्यार्थ्यांसाठी फारच त्रासदायक आहे. अन्य राज्यांमधील राज्य विद्यापीठे आणि डीम्ड विद्यापीठे हे १०० गुणांची अभियोग्यता चाचणी घेऊन परिचारिका पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देतात, असे महाराष्ट्र परिचारिका परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रामिलग माळी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button