breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवे संचालक मंडळ सत्तेवर येताच नगर अर्बनवर आरबीआयचे निर्बंध

अहमदनगर – नगर अर्बन बँकेची निवडणूक पार पाडून नवीन संचालक मंडळ सत्तेवर बसताच अवघ्या सहा दिवसांत या बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधानुसार, बँकेच्या खातेदारांना आता फक्त १० हजार रुपयेच काढता येणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने बँकिंग व्यवस्थापन कायदा, १९४९च्या नियमांतर्गत नगर अर्बंन बँकेवर ६ डिसेंबरपासून सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू केले आहेत. सहा महिन्यांनंतर परिस्थितीची पाहणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. या निर्बंधामुळे बँकेच्या खातेदारांना आपल्या बचत किंवा चालू खात्यातून केवळ १० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्याचप्रमाणे बँकेला कोणतेही नवीन कर्ज देण्याला बंदी घालण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या परिसरात लावावी, त्यामुळे खातेदारांना त्याची माहिती मिळू शकेल, असे रिझर्व्ह बँकेने बजावले आहे. बँकेवर करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे बँकेचा परवाना रद्द करणे नसल्याचेही केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नगर अर्बन बँकेचे एनपीएचे प्रमाण वाढल्याने रिझर्व्ह बँकेने ऑगस्ट २०१९ मध्ये तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून बँकेवर प्रशासक नेमणूक होती. गेल्या महिन्यात बँकेची निवडणूक झाली. २८ नोव्हेंबरला मतदान झाले, तर ३० नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि माजी अध्यक्ष, माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या कार्यकर्त्यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ता आणली. १ डिसेंबरला नव्या संचालकांनी राजेंद्र अग्रवाल यांची अध्यक्षपदी, तर दिप्ती गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशासकाकडून अध्यक्षांकडे कारभार सोपविला. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी बँकेवर निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे नव्या संचालकांच्या कारभारावरही एकप्रकारे निर्बंध आले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button