पिंपरी / चिंचवडपुणे

खंडणीखोर देवा जमादारला महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरून अटक

– पिस्तुलाच्या धाकाने मागायचा खंडणी

पिंपरी l प्रतिनिधी

किराणा दुकानदाराला आणि एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागणा-या देवा जमादार आणि त्याच्या एका साथीदाराला अक्कलकोट तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. देवा जमादार आणि त्याचा साथीदार उसाच्या शेतात लपून बसले असता त्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

देवानंद उर्फ देवा भीमाशंकर जमादार (वय 24, रा. दांगटवस्ती, किवळे, देहूरोड), सॅमसन उर्फ छोट्या अँथोनीपॉल झेवीयर (वय 29, रा. गजानन सोसायटी, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी देवा जमादार याने 10 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता मामुर्डी येथील एका महिलेच्या घरी जाऊन महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून हजारो रुपयांची मागणी केली. मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर देवा याने गहुंजे येथील एका किराणा मालाच्या दुकानात जाऊन पिस्तूल दाखवत दुकानदाराकडे खंडणी मागितली. तिथे देखील देवा याला पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली आणि तो निघून गेला. याप्रकरणी तळेगाव दाभाडे आणि देहूरोड पोलीस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

देवा याच्यावर वाकड, देहूरोड, चिखली, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल आहेत. त्यातील तीन गुन्ह्यात तो फरार होता. गुन्हा केल्यानंतर देवा त्याच्या साथीदारासह अक्कलकोट तालुक्यात जकापूर गावात वास्तव्य करत असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना मिळाली.

त्यानुसार शनिवारी (दि. 15) दरोडा विरोधी पथकाने अक्कलकोट गाठले. आरोपी जकापूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर उसाच्या शेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उसाच्या शेताला घेराव घालून सापळा रचत देवा आणि सॅमसन या दोघांना ताब्यात घेतले.

दोघांना पुण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघांना अटक करून देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button