रांका ज्वेलर्सचा हेड कॅशियर 17 लाखांची सोन्याची बिस्किटे घेऊन पसार
पिंपरी l प्रतिनिधी
रांका ज्वेलर्सच्या मालकांनी हेड कॅशियरला 17 लाखांची सोन्याची बिस्किटे आणि वेढण्या दिल्या. हे सोने घेऊन हेड कॅशियर परागंदा झाला. हा प्रकार डिसेंबर 2021 ते 20 मार्च 2022 या कालावधीत एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील रांका ज्वेलर्सच्या शाखेत घडला.
राजेंद्र चंदनमल भंडारी (वय 65, रा. भोसरी) असे पसार झालेल्या हेड कॅशियरचे नाव आहे. याप्रकरणी तेजपाल पुखराज रांका (वय 47, रा. वानवडी, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रांका ज्वेलर्सचे एक शोरूम एम्पायर इस्टेट चिंचवड येथे आहे. डिसेंबर 2021 ते 20 मार्च 2022 या कालावधीत फिर्यादी यांनी 17 लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे आणि वेढण्या हे दुकानातील हेड कॅशियर राजेंद्र भंडारी यांना दिल्या. ही सोन्याची बिस्किटे आणि वेढण्या घेऊन राजेंद्र भंडारी कोणाला काहीही न सांगता निघून गेले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.