breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजू मिसाळ यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजू मिसाळ यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कार्यकाळ 7 सप्टेंबर 21 रोजी संपुष्टात आला. अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मिसाळ यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला. दरम्यान, निवडणुकीला अवघे चार महिने बाकी असल्याने पक्षश्रेष्ठी मिसाळ यांना कायम ठेवणार की नवीन चेह-याला संधी देणार याबाबत मात्र कमालीची उत्सुकता आहे.

दरम्यान, काही महिला नगरसेविकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेऊन शेवटच्या तीन ते चार महिन्यांसाठी विरोधी पक्षनेतेपदी काम करण्याची संधी देण्याची मागणी केली आहे. पिंपरी महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले.

36 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा गटनेता विरोधी पक्षनेता आहे. कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचे निधन झाले. त्यामुळे राष्ट्रवादीची संख्या 34 झाली. विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो, त्यामुळे हे पद मानाचे आहे.

महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर पाहिल्यांदाच विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रवादीने योगेश बहल यांच्याकडे पहिल्यावर्षी विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली. त्याचवेळी प्रत्येकवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

या नियमानुसार योगेश बहल, दिवंगत दत्ता साने, नाना काटे यांनी वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर राजीनामा दिला. काटे यांच्यानंतर राजू मिसाळ यांची 7 सप्टेंबर 2020 रोजी विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. पक्षाच्या ठरलेल्या अलिखित नियमानुसार मिसाळ यांचा एक वर्षाचा कालावधी 7 सप्टेंबर 2021 रोजी संपुष्टात आला. तो कालावधी संपून एक महिना होत आला आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता बदलण्याची मागणी इच्छुकांकडून केली जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणूक होईल. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विरोधी पक्षनेता बदलणार की मिसाळ यांनाच कायम ठेवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पक्षश्रेष्टींनी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला तर महिला नगरसेविकेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. चारहीवेळा राष्ट्रवादीने पुरुष नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. एकाही महिला नगरसेविकेला विरोधी पक्षनेतेपद दिले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला आक्रमक विरोधी पक्षनेत्याची आवश्यकता आहे.

नेतृत्व बदल केल्यास एखाद्या महिला नगरसेविकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत काही महिला नगरसेविकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतल्यास मागीलवेळी तीव्र दावेदार असलेले अजित गव्हाणे, वैशाली घोडेकर यांच्यात स्पर्धा होईल. गव्हाणे, घोडेकर यांना संधी मिळते की ऐनवेळी दुस-या कोणाला संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचे पक्षाचे ठरले होते. विरोधी पक्षनेता बदलण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button