breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

पंतप्रधानांनी बूस्टर डोसविषयी घोषणा करताच राजेश टोपेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या घोषणा केल्या. या घोषणांचं आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी स्वागत केलंय. लहान मुलांचं लसीकरण, बूस्टर डोस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याची मागणी राज्याच्या वतीनं १६ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती. ही मागणी मान्य झाल्याचा आनंद असून आता लसीकरणाचं योग्य नियोजन राज्याच्या आरोग्य विभागाकडून केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

केंद्र सरकारने घेतलेल्या या सर्व नवीन निर्णयाचे योग्य व्यवस्थापन करून अंमलबजावणी केली जाईल. लहान मुलांच्या जास्तीत जास्त लसीकरणासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पात्र लोकांना लवकरात लवकर बूस्टर डोस देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केल्यानंतर टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला.

  • पंतप्रधानांच्या घोषणा काय…

करोना योद्धांना १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार, सोबतच १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. ३ जानेवारीपासून या मुलांचं लसीकरण सुरू होणार आहे. तर ६० वर्षांवरील नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल, अशा तीन महत्वाच्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. ओमियोक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

  • जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहन…

करोनाची महासाथ अद्याप संपलेली नसल्याने आपल्याला आणखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशाच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निरंतर काम केले. तज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि वयोगट ठरवून मोहीम राबवली. आपल्या लसीकरण मोहीमेला ११ महिने पूर्ण होत असताना आपण लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले, १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सोमवार, ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल. या निर्णयामुळे करोना विरोधातील लढाई आणखी मजबूत होईल. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंताही कमी होईल. करोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन आजपर्यंत १४१ कोटी लसमात्रा देण्यात आल्या असून ९० टक्क्यांहून अधिक पात्र नागरिकांनी पहिली लसमात्रा घेतली आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली.

  • महाराष्ट्रासह दहा राज्यांत केंद्रीय पथके

महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्रीय पथके पाठवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. रुग्ण संपर्कशोध, प्रतिबंधात्मक कार्यवाही, करोना चाचण्या आणि रुग्णांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवणे आणि त्यातील काही नमुने ‘इन्साकॉग’ या केंद्रीय यंत्रणेकडे पाठवण्याचे काम ही पथके करतील.

करोना नियमांच्या काटेकोर पालनावर लक्ष ठेवणे, रुग्णालयांतील खाटांचा आढावा घेणे, रुग्णवाहिका, श्वसनयंत्रे आणि प्राणवायूची उपलब्धता आणि लसीकरणातील राज्याच्या प्रगतीचा आढावाही पथके घेतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button