breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरे इतिहासात रमले आहेत : खासदार सुप्रिया सुळे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत (Raj Thackeray Speech) मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं. राज यांच्या या टीकेचा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी समाचार घेतला असून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तरुणांच्या खऱ्या प्रश्नांवर भाष्य केल्याचं मी तरी ऐकलं नाही. ते इतिहासात रमले असल्याचं मला दिसलं आणि ज्या व्यक्तीने हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं त्या व्यक्तीविषयी मी काय बोलणार?’ असा खरमरीत सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली. ‘खरंतर मी काल माझ्या मतदारसंघात होते, त्यामुळे राज यांचं संपूर्ण भाषण बघण्याची संधी मला मिळाली नाही. मात्र वर्तमानपत्रांतून जे काही वाचलं त्यानुसार ते भाषणात ९५ टक्के राष्ट्रवादीवरच बोलले आहेत. त्यामुळे आमचा पक्ष किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं. राज ठाकरे यांनी काल व्यक्तीगत हल्ला केला. त्यांनी भाषणात जे मुद्दे मांडले ते वाचून मला आश्चर्य वाटलं. कारण आज देशासमोर आणि राज्यासमोर महागाई आणि रोजगारासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत,’ असं सुळे यांनी म्हटलं आहे.

‘राज ठाकरेंच्या टीकेकडे मनोरंजन म्हणून बघावं’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर ईडीची धाड टाकली जाते, मात्र सुप्रिया सुळेंवर धाड टाकली जात नाही, याचा अर्थ काय? शरद पवार हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पक्षातील नेत्यांना अडकवत आहेत, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. याबाबत उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या आरोपांकडे गांभीर्याने न बघता मनोरंजन म्हणून बघावं, असा टोला लागवला आहे.

दरम्यान, ठाण्यात काल घेतलेल्या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. शरद पवार यांनी राज्यात जातीय राजकारण करून जाती-जातींमध्ये भांडण लावलं, असा घणाघात राज यांनी केला. तसंच सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button