ताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरे हिंदुत्व व भाजपच्या अधिक जवळ; बदलत्या भूमिकेचे पाडवा मेळाव्यात स्पष्ट संकेत

 मुंबई | मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वातावरण तयार होण्यास सुरुवात झालेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे आयोजित जाहीर सभेत शनिवारी हिंदुत्वाच्या दिशेने एक पाऊल आणखी पुढे टाकले. तसेच सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधी भूमिकेपासूनही उलट प्रवास सुरू केल्याचे संकेत त्यांनी आपल्या भाषणातून दिले आहेत. उत्तर भारतीयांवर टीकेच्या माध्यमातून तुटून पडणाऱ्या राज यांनी आज उत्तर प्रदेशात विकास सुरू झाल्याचे प्रमाणपत्र आपल्या भाषणातून दिले.

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी जन्म घेतलेल्या शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात लढता लढता हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र भाजपच्या महाप्रचंड सत्तेविरोधात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी संबंध तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आता त्या निमित्ताने तयार झालेली राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे शनिवारच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.

मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यासारख्या नेत्याने घेतलेल्या भूमिकेचाच अधिक आक्रमक पुनरुच्चार करत मशिदींसमोर दुप्पट क्षमतेचे ध्वनिक्षेपक लावून त्यावर हनुमान चालीसा लावण्याचे मनसे कार्यकर्त्यांना त्यांनी केलेले आवाहन हे हिंदुत्वाकडील प्रवासाचे द्योतक आहे. ‘मातोश्री’शेजारील बेहरामपाड्याचे उदाहरण देत त्यांनी शिवसैनिकांना टोला लगावला. १९९२-९३च्या दंगलीत बेहराम पाड्यातील दंगल ही सर्वाधिक काळ सुरू होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी बेहराम पाड्याच्या विरोधात अत्यंत आक्रमक भाषेत टीका केली होती, त्याचीच आठवण झाल्याचे राज यांच्या आजच्या भाषणानंतर काही जुन्या शिवसैनिकांचे म्हणणे पडले.

आजवरच्या प्रत्येक भाषणात उत्तर भारतीयांवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या राज यांनी शनिवारी आपल्या भाषणात उत्तर भारतीयांबाबत मवाळ भूमिका तर घेतलीच; शिवाय उत्तर भारतात विकास सुरू झाला असल्याचे ठोस विधानही केले. मात्र हा विकास नक्की कोणत्या प्रकारे होत आहे, हे एरव्ही अनेक उदाहरणे व व्हिडीओ क्लिपद्वारे दाखवणाऱ्य़ा राज यांनी तसे काहीही केले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

भाजपचा सध्याचा मुख्य शत्रू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवताना, राष्ट्रवादी ही हिंदू धर्मियांमध्ये जाती पातींचे राजकारण करून फूट पाडत असल्याचा आरोप तर केलाच; शिवाय २०१९च्या निवडणूक प्रचारात केंद्रीय यंत्रणांच्या सुरू असलेल्या गैरवापरावर तुटून पडणाऱ्य़ा राज यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरही टीका केली. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होणार किंवा नाही हे नक्की नसले तरी राज ठाकरे हे आता राजकीयदृष्ट्या भाजपच्या अधिक जवळ गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button