उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर शिवसेना आणि शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी तसेच हडपसरमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडणार असल्याची माहिती शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम होत असल्याने शहर शिवसेनाला आणखी बळ मिळणार आहे.
येत्या ९ फेब्रुवारी रोजी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी भानगिरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले असल्याचेही भानगिरे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील लाडक्या बहिणींसाठी भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम, दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप, महिलांना रोजगाराभिमुख साहित्य वाटप करणार आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्याचबरोबर हडपसर मतदारसंघातील तरवडे वस्ती येथे संतसृष्टी मध्ये नुकत्याच उभारण्यात आलेल्या २१ फुटांच्या भव्य विठ्ठलाच्या मूर्तीचे आणि संतसृष्टीचे लोकार्पण, महात्मा फुले जलतरण तलाव तसेच हडपसर ते महादेववाडी अंतर्गत डीपी रस्ते आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने हडपसर मतदारसंघासह पुणे शहरात विविध विकासात्मक बदल घडवून आणण्याचा विश्वास दिल्याचे भानगिरे यांनी सांगितले.