जवळार्जूनमध्ये सरपंचांना बंदुकीचा धाक!
गुन्हेवृत्त: अवैध दारू व्यावसायिकाचा दहशत

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव असलेल्या जवळार्जूनमध्ये सरपंचांना थेट बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सरपंच सोमनाथ दत्तात्रय कणसे यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या प्रशांत रमेश राणे याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.
गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांनी जवळार्जून ग्रामपंचायत सतत चर्चेत आहे. सरपंच पदभार स्वीकारल्यानंतर सोमनाथ कणसे यांना वेळोवेळी विरोध आणि दबावाचा सामना करावा लागला. अलीकडील ग्रामसभेत त्यांनी गावातील अवैध दारू अड्डा बंद करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. याचा राग मनात धरून प्रशांत राणे याने रविवारी (दि. १६) सकाळी ११.३० वाजता सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान कणसे यांच्यावर हल्ला केला.
फिर्यादीनुसार, राणे याने ताब्यातील बेकायदेशीर पिस्तुल काढून सरपंचांना धमकावले, शिवीगाळ केली तसेच जीव घेण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची मागणीही काही उपस्थितांच्या समक्ष केली. घटनेनंतर कणसे यांनी तत्काळ पोलीसांत तक्रार दाखल केली.
हेही वाचा – ‘मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा’; आयुक्त श्रावण हर्डीकर
सोमवारी (दि. १७) फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी प्रशांत राणे याला रात्रीच अटक केली. मंगळवारी सासवड न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपासाचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश पाटील करीत आहेत.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून सरपंच कणसे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अवैध दारू व्यवसायामुळे गावात निर्माण झालेल्या दहशतीला आळा बसावा, अशीही ग्रामस्थांची अपेक्षा आहे.




