पूर्वनियोजनाअभावी कात्रज चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ
उड्डाणपुलाचे काम मुख्य चौकात असल्याने वाहूतक सुरु ठेवणे शक्य नाही
कात्रज : कात्रज चौकातील वाहतूकीचे कोणतेही पूर्वनियोजन न करता वाहतूक वळविल्याने मंगळवारी (ता. १) सकाळी वाहनचलाकांचा पूर्णपणे गोंधळ उडाला. पूर्वनियोजनाअभावी कात्रज चौकात वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाल्याने उड्डाणपुलाचे काम थांबविण्याची वेळ राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रशासनावर येणार आहे.
चौकात सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूकोंडी होती. मुख्य चौकातील मुख्य रस्त्यावर उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरु करायचे असल्याने प्रायोगित तत्वावर मुख्य चौकातील वाहतूक बंद करुन ती नवलेपुलाच्या बाजूने गर्डर टाकण्यात आलेल्या दोन पिलरच्या खालून कोणतेही पूर्वनियोजन न करता वळविण्यात आली.
त्यामुळे सातारा रस्त्यावर शंकर महाराज उड्डाणपूलापासून ते कात्रज घाटापर्यंत आणि नवलेपूलापासून ते कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मांगडेवाडी, संतोषनगर, कात्रजगाव, सच्चाईमाता परिसर, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द, दत्तनगरचौक, गुजर-निंबाळकरवाडी रस्ता,
कात्रज-कोंढवा रस्ता, नऱ्हेगाव अशा विविध भागात याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. तसेच, या परिसरातील लहान-सहान रस्त्यावरही वाहतूककोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळपासूनच विद्यार्थी, नोकरदार यांना वेळेवर इच्छितस्थळी पोहोचता आले नाही. यावेळी पोलीस प्रशासनाबरोबर मोठ्या प्रमाणात नागरिक वाहतूकीचे नियोजन करताना दिसले.
या उपाययोजनांची गरज
-उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी पर्यायी रस्त्याची गरज
-चौक आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असणारी अतिक्रमणे हटविणे
-सातारा रस्त्यावरून स्वारगेटला आणि स्वारगेटवरून सातारामार्गे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस काही काळासाठी नवलेपूलमार्गे वळविणे
-बहुसंख्य पीएमटी बसेस कात्रज चौकात न येऊ देता मोरेबाग परिसरातून वापस वळविणे
-नवलेपुलाकडून स्वारगेट परिसरात जाणारी वाहने वंडरसिटी कात्रज डेअरी मार्गे वळविणे
-सातारा रस्ता परिसरातून कोंढव्याकडे जाणारी वाहने गुजरवाडीफाट्यावरून वळविणे
-साताऱ्याकडून येणारी स्वारगेटच्या बाजूला येणारी सर्व वाहने कात्रजचौकात न येऊ देता नवलेपूलमार्गे वळविणे
-कात्रज चौकातील वादात असलेल्या जागांचे भूसंपादन युद्धपातळीवर करणे
सकाळी मी मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलो होते. चौकातील नियोजनशून्य कारभारामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्याचा फटका मला बसला. वापस यायला उशीर तर झालाच शिवाय कार्यालयीने वेळेत कार्यालयात पोहोचणे या वाहतूककोंडीने अशक्य झाले. प्रशासनाने योग्य ते नियोजन करुन हे काम सुरु करणे गरजेचे आहे.
-योगेश हांडगे, स्थानिक नागरिक
उड्डाणपुलाचे काम हे मुख्य चौकात आले असल्याने काम सुरु असताना वाहूतक सुरु ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही आज प्रायोगित तत्वावर वाहतूकीत बदल केले होते. परंतु ते अयशस्वी झाले असून सद्यस्थितीत वाहतूक बदल करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
-अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक