स्वारगेट परिसरात कर्जवसुली साठी खोलीत डांबून एकाला बेदम मारहाण
पुणे | फायनान्स कंपनीची कर्ज वसुली करणाऱ्या एजन्सीच्या काही कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला खोलीत डांबून ठेवत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला असून कर्ज वसूल करणाऱ्या एजन्सीच्या पदाधिकारी विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडीतील एका 52 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
श्री एंटरप्राइजेस रिकवरी एजन्सीचे मालक आणि तीन अनोळखी व्यक्ती विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जून रोजी दुपारच्या सुमारास स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी यांनी एका फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले होते. आरोपी हे या कंपनीचे कर्ज वसुलीचे काम करत आहेत. आरोपींनी फिर्यादी कडून खर्च वसूल करण्यासाठी त्यांना बराच काळ डांबून ठेवले होते. तसेच कर्जाचे पैसे दिले नाही तर हात-पाय तोडण्याची धमकी दिली होती. फिर्यादी हे या रिकवरी एजन्सीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना आरोपींनी धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून स्वारगेट पोलीस अधिक तपास करीत आहेत.