पुरावे मिळाल्यास आपणही लढू ! ईव्हीएम विरोधात राज ठाकरेंनी केली पुण्यात घोषणा
पुणे : ईव्हीएम विरोधात मी स्वत: २०१४ मध्ये आवाज उठविला होता. मात्र, त्या वेळी कोणताही राजकीय पक्ष माझ्या सोबत उभा राहिला नाही. आता लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर सर्वच विरोधीपक्ष ईव्हीएम अचूकतेबाबत शंका उपस्थित करत आहेत. याबाबत आपल्याकडे ठोस पुरावे मिळाल्यास आपणही त्याविरोधात लढा देऊ. मात्र, आता आपण या पक्षांच्या सोबत जाणार नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांंनी आपल्या उमेदवारांना सांगितले.
विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात मोठ्या पराभवाचा सामाना करावा लागला असून, पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील पराभूत उमेदवार, तसेच पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. या बैठकीत सर्वच उमेदवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली. त्यावर ठाकरे यांनी या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा – ‘फुकटचा सल्ला नको’; अजितदादांचा रोहित पवारांना टोला
या बैठकीत ठाकरे यांनी सर्व पराभूत उमेदवारांना खचून न जाता पुन्हा नव्याने पक्ष, तसेच पक्षसंघटनेसाठी काम करण्याच्या सूचना केल्या. यापुढे राज्यातील सर्व निवडणुका पक्ष स्वबळावरच लढणार असून, त्यासाठीही संघटन मजबूत करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या. याशिवाय त्या- त्या वेळी पक्षाकडून कोणासोबत जायचे अथवा नाही, याचा निर्णय घेतले जातील. मात्र, तूर्तास आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.