सायबर चोरट्यांनी बनविले पीएमपीचे हुबेहुब ॲप!

पुणे : सायबर चोरट्यांनी वैयक्तिक नागरिकांच्या फसवणूकीबरोबरच आता आर्थिक व्यवहार होणाऱ्या शासकीय अॅपवरही वाॅच ठेवून फसवणूकीचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. पीएमपीएमएलने सुरू केलेल्या आपली पीएमपीएमएल या मोबाईल अॅपचे बनावट अॅप तयार करून फसवणूकीचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी बनावट अॅपच्या जाहिरातींना बळी पडू नये, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाने आपली पीएमपीएमएल हे मोबाईल अॅप सुरू केले असून, आॅगस्ट २०२४ मध्ये अॅपचे उद्घाटन करून प्रवाशांच्या वापरासाठी सुरू आहे. मागील सहा महिन्यात या अॅपला प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अॅपवरून एक दिवसाच्या पासपासून वार्षिक पास, तिकिट बुकिंग करता येत असल्यामुळे या अॅपच्या माध्यमातून पीएमपीला महिन्याला कोट्यावधी रुपये मिळतात.
आता पीएमपीच्या या कमाईवर सायबर चोरट्यांची नजर पडली असून, चोरट्यांनी हुबेहुब दिसेल असे बनावट मोबाईल अॅपची जाहिरात यु-ट्युब वरील काही चॅनल्स, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर सुरू केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या बनावट अॅपच्या माध्यमातून पीएमपीएमएल प्रवाशांची दिशाभूल करून त्यांच्या आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून सावधगिरीचे उपाय योजले जात आहेत.
हेही वाचा – स्वच्छ, मुबलक पाण्यासाठी महापालिका देणार प्राधान्य; नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवणार
आपली पीएमपीएमएल या मोबाईल अॅपच्या बनावट अॅप ची जाहिरात करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरूद्ध पोलीस प्रशासनाच्या सायबर सिक्युरिटी सेल विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सायबर सिक्युरिटी सेल व पीएमपीएमएलची तांत्रिक विश्लेषण टीम बनावट अॅपच्या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवत असून, यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर आय.टी. अॅक्टनुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे आयटी सेलकडून सांगण्यात आले.
कशी करतात फसवणूक…
यु-ट्युब, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टा या समाजमाध्यमांवर बनावट अॅपची जाहिरात करून आम्ही तुम्हाला Apli PMPML चे अॅप देतो, त्यावरून तुम्ही पैसे न देता पास काढू शकता अशा भूलथापा देवून बनावट अॅप ची विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत आयटी सेलमधील एका कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्यावर प्रकार उघडकीस आला. संबधित बनावट अॅपच्या आयपी अॅड्रेसपर्यंत पोहचण्याचा प्रयत्नही केला. या सायबर चोरट्यांवर लक्ष ठेवून असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
प्रवासी नागरिकांनी समाजमाध्यमांवरील Apli PMPML या बनावट मोबाईल अॅपच्या जाहिरातींना बळी पडू नये. तसेच पीएमपीएमएलचे बनावट अॅप वापरताना कोणी आढळल्यास अशा व्यक्तींविरूद्ध देखील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
– नितीन नार्वेकर – सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी