देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी ‘मार्च एण्डिंग’लाच संप पुकारला
देशभरातील बँकांचे तब्बल आठ लाखांहून अधिक कर्माचारी हे २४ आणि २५ मार्च रोजी संपावर जाणार

पुणे : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी ‘मार्च एण्डिंग’लाच संप पुकारला आहे. देशभरातील बँकांचे तब्बल आठ लाखांहून अधिक कर्माचारी हे २४ आणि २५ मार्च रोजी संपावर जाणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी सार्वजनिक, खासगी, सहकारी आणि ग्रामीण बँक कर्मचाऱ्यांनी संपाचं शस्त्र उगारलं आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने २४ आणि २५ मार्च रोजी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. यामुळे देशभरातील सार्वजनिक आणि खाजगी बँकांच्या सेवा विस्कळीत होऊ शकतात. भारतीय बँकांची संघटना असलेल्या इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) सोबत चर्चा अयशस्वी झाल्यानंतर हा संप पुकारण्यात आला आहे.
हेही वाचा : सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
दरम्यान, बँकांना कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत असल्याने पुरेशी भरती करण्याची युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सची मागणी आहे. तसेच सरकारी कार्यालयांप्रमाणे बँकांचे कामाचे वेळापत्रक सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवसांचे असावे जेणेकरून काम आणि आयुष्याचा समतोल राखता येण्यास मदत होईल, अशी मागणी कर्मचार्यांची आहे. बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणीसह ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा करून कमाल मर्यादा २५ लाख रुपये करण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांची आहे. मिळलेल्या माहितीनुसार, एसबीआय, पीएनबी, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेने या संपाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु या संपाचा परिणाम सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि ग्रामीण बँकांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे.