शिवसेना नेत्याच्या हत्येनं खळबळ; मध्यरात्री धारधार शस्त्रांनी हल्ला

पुणे |महाईन्यूज|
पुण्यातील शिवसेनेचे कसबा विभागप्रमुख दीपक मारटकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत, गुरुवारी रात्री त्यांची हत्या करण्यात आली. मारटकर यांच्या घराजवळ म्हणजे, बुधवार पेठेतील गवळी आळीत रात्री साडेबाराच्या सुमारास ही भयानक घटना घडली. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दीपक हे शिवसेनेचे दिवगंत नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते.
सरीकडे, मारटकर यांच्या निधनानंतर शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांत हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेचा तपास करून हल्लेखोरांना धडा शिकविण्याची मागणीही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करीत आहेत. गंभीर बाब म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी दीपक यांचे वडील विजय मारटकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घरी जेवण केल्यानंतर दीपक हे गुरुवारी रात्री त्यांच्या कार्यालयाबाहेर आले. त्या परिसरात आधीच दबा धरून बसलेल्या चार-पाच हल्लेखोरांनी दीपक यांच्यावर कोयता आणि अन्य धारदार शस्त्राने वार केले. त्यात दीपक यांच्या डोळ्यासह छातीवर जबर दुखापत झाली. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पळ काढला. हल्ल्यात जखमी झालेल्या दीपक यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांत दाखल करण्यातआले. मात्र, पहाटे त्यांचे निधन झाले.
दीपक यांच्यावरील हल्ल्याचे कारण कळू शकलेले नाही. मात्र, या प्रकरणात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक यांचे वडील विजय मारटकर हे बुधवार पेठ भागातून दोनदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. महापालिकेच्या मागील दोन निवडणुकांत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर राजकारणात सक्रिय होऊन दीपक हे आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी करीत होते. त्यातून त्यांच्याकडे शिवसेनेचे कसबा विभाग प्रमुखपद आणि युवा सेनेची जबाबदारी देण्यात आली होती.