यवत गावावर पसरली शोककळा

पुणे – पुणे-सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात यवत गावातील आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. अपघाताच्या मन विषण्ण करणाऱ्या बातमीने गावातील दैनंदिन व्यवसाय सुरूच झाले नाहीत. बाजारपेठ संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. नातेवाइक, मित्र, कार्यकर्ते मृत तरुणांच्या घरी सांत्वनासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते.
शुभम रामदास भिसे (वय १९), विशाल सुभाष यादव (वय २०), अक्षय चंद्रकांत घिगे (वय २०), ऋषिकेश गणेश यादव (वय २०), अक्षय भरत वायकर (वय २२), नूरमहंमद अब्बास दाया (वय २२), परवेझ अशपाक आतार (वय २१), जुबेर अजीज मुलाणी (वय २१, सर्व रा. यवत) हे सर्व जण यवत येथील विद्या विकास मंदिर येथे दहावीपर्यंत एकत्र शिकलेले आहेत. पुढे शिक्षणासाठी व करिअरसाठी वाटा वेगळ्या झाल्या तरी ते सतत एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र, त्यांच्यावर अशा पद्धतीने काळाने घाला घातल्याची माहिती समजताच विद्या विकास मंदिर शाळेने शाळा बंद ठेवली होती.