मिळकतकर वसुली 450 कोटींच्या घरात
- मे अखेर 550 कोटींचा टप्पा ओलांडणार?
– 1600 कोटींचे उत्पन्न अपेक्षित
पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागास पहिल्या दीड महिन्यात तब्बल 450 कोटींची उत्पन्न मिळाले आहे. तर 31 मेपूर्वी मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून करांमध्ये 5 ते 10 टक्के सवलत देण्यात येत असल्याने मेच्या शेवटच्या आठवड्यात आणखी सुमारे 100 कोटींचा कर मिळणे अपेक्षीत असल्याचे करसंकलन विभागाचे प्रभारी प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडे शहरातील सुमारे 8 लाख 72 हजार मिळकतींची नोंद आहे. त्यानुसार, महापालिकेकडून या सर्व करदात्यांना मिळकतकराची नोटीस बजाविली असून सुमारे 1600 कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहेत. त्यातील सुमारे 5 लाख 55 हजार करदाते नियमित कर जमा करतात. त्यांना महापालिकेकडून एप्रिच्या पहिल्या आठवड्यातच बिले पाठविण्यात आली आहेत. त्या शिवाय, एसएमएसद्वारे ऑनलाइन बिल भरण्याची लिंकही सुमारे साडेसहा लाख मिळकतधारकांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी सवलतीच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांकडून कर भरण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. मागील वर्षी 1 एप्रिल ते 23 मे 2017 या कालावधीत सुमारे 411 कोटी रूपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला होता. तर या वर्षी त्यात सुमारे 39 कोटींची वाढ झाली असून मिळकतकराचे उत्पन्न 450 कोटी झाले आहे. तर मागील वर्षी 23 मे रोजी सुमारे 23 कोटींचा कर जमा झाला होता. यावर्षी त्यात वाढ होऊन या एकाच दिवशी 35 कोटी 84 लाख रुपयांचा कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.